Ratan Tata Death News: युवराज सिंहपासून अजित आगरकरांपर्यंत...; रतन टाटांच्या टीमसाठी खेळले, विश्वचषक गाजवले!
Ratan Tata Death News: रतन टाटा यांनी भारतीय क्रिकेटच्या विकासात देखील महत्वाचे योगदान दिले आहे.
Ratan Tata Death News: देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. राजकीय, मनोरंजन, क्रीडाविश्वासह सर्व क्षेत्रातून रतन टाटा यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रतन टाटा यांनी भारतीय क्रिकेटच्या विकासात देखील महत्वाचे योगदान दिले आहे. भारतातील अनेक दिग्गज खेळाडू रतन टाटा यांच्या संघासाठी क्रिकेट खेळले आहेत.
रतन टाटा (Ratan Tata) यांच्या काळात टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी अनेक भारतीय क्रिकेटपटूंना पाठिंबा दिला. यामध्ये अनेक क्रिकेटपटूंचा समावेश होता, ज्यांनी देशाला विश्वचषक जिंकून दिला. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी क्रिकेटपटूंना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यामुळे क्रिकेटलाच करिअर म्हणून निवडून देशासाठी खेळू शकणारे अनेक क्रिकेटपटू होते. टाटा समूहाने भारताचे दिग्गज खेळाडू आणि 1993 च्या विश्वविजेत्या संघाचा एक भाग असलेल्या मोहिंदर अमरनाथ यांना खूप पाठिंबा दिला. मोहिंदर अमरनाथ यांना टाटा समूहाच्या एअर इंडियाने मोठा पाठिंबा दिला. मेहंदरला एअर इंडियाकडून पगार मिळत असे. याशिवाय फारुख इंजिनियर टाटा मोटर्ससाठी क्रिकेट खेळायचे.
संजय मांजरेकरांपासून अजित आगरकरांपर्यंत...
टाटा समूहाने संजय मांजरेकर, रॉबिन उथप्पा, जवागल श्रीनाथ, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफ या दिग्गज खेळाडूंनाही पाठिंबा दिला. हे सर्व खेळाडू टाटा इकोसिस्टमचा भाग होते. टाटा स्टीलने टीम इंडियाचे विद्यमान मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनाही खूप मदत केली. 2007 रोजी टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले होते. या संघात अजित आगरकर देखील होते. सध्या खेळत असलेल्या शार्दुल ठाकूरला टाटा समूहानेही खूप पाठिंबा दिला आहे. टाटा पॉवरने शार्दुल ठाकुरला खूप पाठिंबा दिला आहे.
खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली-
क्रीडाविश्वातून सचिन तेंडुलकर रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, इरफान पठाण, सुरेश रैना, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, युसुफ पठाण, ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा यांनी ट्विट करत सोशल मीडियाद्वारे रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
सचिन तेंडुलकरने सकाळी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत सचिन तेंडुलकर म्हणाले की, रतन टाटा यांच्यासोबत वेळ घालवण्याचे भाग्य मला लाभले. पण लाखो लोक जे त्यांना कधी भेटले नाहीत, त्यांचे दु:ख मला समजते. प्राण्यांवरील प्रेमापासून ते परोपकारापर्यंत रतन टाटा यांनी दाखवून दिले की खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण त्यांची काळजी घेतो, असं सचिन तेंडुलकर म्हणाला.