Prithvi Shaw : पृथ्वी शॉने केला रणजी ट्रॉफी इतिहासातील दुसरा सर्वात मोठा स्कोर, 379 धावा करत तोडले अनेक रेकॉर्ड
Ranji Trophy 2022-23: रणजी ट्रॉफीमधील मुंबई विरुद्ध आसाम सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉने 379 धावांची दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
Prithvi Shaw in Ranji Trophy 2022-23 : भारताचा युवा सलीमीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) रणजी ट्रॉफीमध्ये एक धमाकेदार खेळी करत अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. एलायट ग्रुप-बीच्या मुंबई विरुद्ध आसाम सामन्यात त्याने तब्बल 379 धावा केल्या. मुंबईकडून खेळताना त्याने आसामविरुद्ध ही विक्रमी धावसंख्या केली. विशेष म्हणजे रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
पृथ्वी शॉने 382 चेंडू खेळून 379 धावा केल्या. म्हणजेच त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 100 च्या जवळपास होता. या खेळीत त्याने 49 चौकार आणि 4 षटकार मारले. या खेळीमुळे त्याने रणजी ट्रॉफीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी खेळणाऱ्या संजय मांजरेकरचा 32 वर्षे जुना विक्रम मोडला. मांजरेकर यांनी 1991 मध्ये हैदराबादविरुद्ध मुंबईकडून खेळताना 377 धावा केल्या होत्या. सामन्यात पृथ्वी शॉचा रणजी ट्रॉफीतील सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम हुकला. हा विक्रम भाऊसाहेब निंबाळकर यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. निंबाळकर यांनी 1948-49 मध्ये महाराष्ट्राकडून खेळताना काठीवाडविरुद्ध 4430 धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र,शॉ याने त्याच्या खेळीतून अनेक दिग्गजांचा रणजी करंडकातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड तोडला. त्याने विजय मर्चंट (359), व्हीव्हीएस लक्ष्मण (353), चेतेश्वर पुजारा (352) आणि सुनील गावस्कर (340) या दिग्गजांना मागे टाकले.
एक खास विक्रमही केला नावावर
आपल्या या अप्रतिम खेळीमुळे पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्येही अनोखा विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक, विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक आणि रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. सध्या, गेल्या एक वर्षापासून पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.
बऱ्याच काळापासून संघात स्थान नाही
पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून भारतीय संघाबाहेर आहे आणि जवळपास दीड वर्षानंतरही तो पुनरागमन करू शकलेला नाही. जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याच वेळी, शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने खेळला. पृथ्वीने भारतासाठी 6 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र सध्याच्या कामगिरीने तो निवडकर्त्यांना प्रभावित करू शकलेला नाही. शॉवर अन्याय होत असल्याचं संघाचा फलंदाज पृथ्वीच्या चाहत्यांचं मत आहे. पृथ्वीबाबत चाहते सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया देत असतात. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला संघात न घेण्याचे कारणही बीसीसीआयला विचारले आहे.
हे देखील वाचा-