PSL 2024: पाकिस्तान सुपर लीगमध्ये गोंधळच गोंधळ; 13 खेळाडू आजारी, एक तर रुग्णालयात दाखल
पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2024 हंगामात, गुरुवारी (29 फेब्रुवारी) कराची किंग्ज आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यापूर्वी कराची किंग्ज संघाचे 13 खेळाडू आजारी पडले होते.
Pakistan Super League 2024: सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2024 सीझनचे सामने खेळवले जात आहेत. पण दरम्यान, गुरुवारी (29 फेब्रुवारी) पीएसएलमध्ये मोठा गदारोळ झाला. त्याचं झालं असं की, पाकिस्तान सुपर लीगमधील कराची किंग्ज संघाचे एक, दोन नव्हे तर तब्बल 13 खेळाडू सामन्यापूर्वी आजारी पडले. कराची किंग्ज संघातील प्रत्येक खेळाडूनं पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली.
गुरूवारी पीएसएलमध्ये कराची किंग्ज संघाचा सामना क्वेटा ग्लॅडिएटर्सशी झाला होता. क्वेटानं हा सामना 5 विकेटने जिंकला. पण त्याच दिवशी सामन्यापूर्वी कराची संघाच्या 13 खेळाडूंनी अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केली. अशा परिस्थितीत प्लेईंग 11 निवडण्यासाठी संघ व्यवस्थापनाला संघर्ष करावा लागला.
🚨 Playing XIs of the two teams 🚨#HBLPSL9 | #KhulKeKhel | #KKvQG pic.twitter.com/GNfk4c7Q0b
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 29, 2024
सामना सुरू होण्यापूर्वी अख्खा संघ पडला आजारी
गुरुवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी कराची किंग्ज संघाचे एक, दोन नाहीतर तब्बल 13 खेळाडू आजारी पडले. पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजनुसार, या 13 खेळाडूंपैकी एकाची तब्येत इतकी बिघडली की, त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र, सामना सुरू होईपर्यंत सर्व खेळाडू बरे होतील, अशी आशाही संघ व्यवस्थापनाला होती. त्यांची ही अपेक्षा काही प्रमाणात खरी ठरली. कर्णधार शान मसूद, शोएब मलिक आणि हसन अलीसह काही खेळाडूंना बरं वाटलं आणि तेही मैदानात आले. मात्र या सगळ्यानंतरही कराची संघाला आपल्या प्लेईंग-11 मध्ये 4 बदल करावे लागले.
सामन्यात शोएब मल्लिक फ्लॉप
कराची संघाच्या प्लेईंग 11 मधून ल्यूस डू प्लॉय, मीर हमजा, आमिर खान आणि तबरेज शम्सी यांना मात्र आराम देणं संघ व्यवस्थापनाला भाग पडलं. त्यांच्याऐवजी जेम्स विंसी, अनवर अली, जाहिद महमूद आणि ब्लेसिंग यांना संधी देण्यात आली. दरम्यान, या सामन्यात कराची संघ टॉस हरल्यानंतर सर्वात आधी फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सर्वात आधी फलंदाजी करताना संघानं 8 विकेट्स घेत 165 धावांची खेळी केली. या काळात जेम्स विंचीनं सर्वाधिक 37 धावा केल्यात. मोहम्मद नवाजनं 28, अन्वर अलीनं 25 आणि टिम शिफर्टनं 21 धावा केल्या. शोएब मलिकला 20 चेंडूत केवळ 12 धावा करता आल्या. क्वेटाकडून अबरार अहमदनं 3 बळी घेतले. उस्मान तारिक आणि अकील हुसेन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले.
क्वेटानं शेवटच्या चेंडूवर जिंकला सामना
कराचीचा या सामन्यात 5 विकेट्सनी पराभव मिळाला. 166 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना क्वेटा संघानं 5 गडी गमावून सामना जिंकला. शेरफेन रदरफोर्डनं संघाकडून सर्वाधिक 58 धावांची खेळी खेळली. त्यानं 27 चेंडूत अर्धशतक ठोकलं. रदरफोर्डनं आपल्या खेळीत 6 षटकार आणि 1 चौकार लगावला. तसेच, जेसन रॉयनं 52 धावांची खेळी केली. कराचीकडून हसन अली आणि जाहिद महमूदनं 2-2 बळी घेतले.