PAK vs ENG, 1st Test: पाकिस्तानची धुलाई! पहिल्या दिवशी इंग्लंडच्या 506 धावा; चार फलंदाजांचं शतक, 112 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
PAK vs ENG 1st Test, Day 1: इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षानंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी (Pakistan vs Engaland) पाकिस्तानमध्ये पोहचलाय.
PAK vs ENG 1st Test, Day 1: इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षानंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी (Pakistan vs Engaland) पाकिस्तानमध्ये पोहचलाय. रावलपिंडी क्रिकेट स्टेडियमर (Rawalpindi Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडनं पहिल्या दिवशी 75 षटकांत चार विकेट गमावून 506 धावा केल्या. यादरम्यान इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतकं झळकावली आहेत. जॅक क्रॉलीनं (122 धावा) ऑली पोप (108 धावा), बेन डकेटनं (107 धावा) आणि हॅरी ब्रूकनं नाबाद 101 धावा केल्या. यासह इंग्लंडचा संघ कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 112 वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी क्रीझवर येताच पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 35.4 षटकांत 233 धावांची भागीदारी केली. डकेट 110 चेंडूत 107 धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 15 चौकार मारले. डकेट बाद झाल्यानंतर क्रॉलीही काही वेळातच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानं 111 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीनं 122 धावांची खेळी केली. डकेटला जाहिद महमूदनं आणि क्रॉलीला हरिस रौफनं मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला
सामन्यातील विक्रम
कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा
कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडनं आपल्या नावावर केला. इंग्लंडनं पहिल्या दिवशी 75 षटकांत चार विकेट्स गमावू 506 धावा केल्या. यापूर्वी 9 डिसेंबर 1910 रोजी सिडनी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 99 षटकांत 6 बाद 494 धावा केल्या होत्या.
परदेशात सर्वाधिक धावा करणारा संघ
इंग्लंड कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणारा पाहुणा संघ ठरला. त्यानं 88 वर्षे जुना विक्रम मोडला. यापूर्वी 1934 मध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडमध्ये कसोटीच्या पहिल्या दिवशी 475 धावांची खेळी केली होती.
कसोटीच्या पहिल्याच दिवशी चार फलंदाजांचं शतक
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सामन्याच्या पहिल्या दिवशी चार फलंदाजांनी शतकं झळकावली आहेत. इंग्लंडकडून जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप आणि हॅरी ब्रुक यांनी शतकं ठोकली आहेत.
सहा चेंडूत सहा चौकारांचा विक्रम
हॅरी ब्रूकनं सौद शकीलच्या षटकात सहा चौकार मारले. कसोटी इतिहासात हे पाचव्यांदा घडलं. भारताच्या संदीप पाटीलनं 1982 मध्ये इंग्लंडच्या बॉब विलिसविरुद्ध पहिल्यांदा एका षटकात सहा चौकार मारले होते. दरम्यान, ख्रिस गेल, रामनरेश सरवान, सनथ जयसूर्या यांच्या नावावर कसोटीच्या एका षटकात सहा चौकार मारण्याची नोंद आहे.
इंग्लंडच्या सलामीवीर एकाच डावात शतक
इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी नऊ वर्षांनंतर एकाच डावात शतक झळकावलं. अॅलिस्टर कुक (116 धावा) आणि निक कॉम्प्टन (117 धावा) यांनी 9 मार्च 2013 रोजी ड्युनेडिन येथे न्यूझीलंडविरुद्ध शतकं झळकावली होती. यावेळी जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी शतक ठोकली.
हे देखील वाचा-