(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ODI WC Schedule : भारत-पाक वर्ल्ड कप सामन्याबाबत जय शाह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
ODI World Cup Schedule 2023, India vs Pakistan : आयसीसीने (ICC) काही दिवसांपूर्वीच भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जारी केले होते.
ODI World Cup Schedule 2023, India vs Pakistan : आयसीसीने (ICC) काही दिवसांपूर्वीच भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जारी केले होते. पाच ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या रनसंग्रामाच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन ते तीन क्रिकेट बोर्डाने आपल्या वेळापत्रकात बदल करम्याबाबत विनंती केली आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाईल, असे जय शाह म्हणाले.
भारतीय संघाच्या विश्वचषक अभियानाची सुरुवात आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्याशिवाय पाकिस्तान आणि भारत यांच्यात होणाऱ्या सामन्याची तारीखही बदलण्याची शक्यता आहे. BCCI सचिव जय शाह यांनी विश्वचषक वेळापत्रकाच्या बदलाबाबत एएनआयशी बोलताना वक्तव्य केले. भारत-पाक सामन्याच्या तारखेमध्ये बदल झाला तर एकापेक्षा जास्त सामन्याच्या तारखेतही बदल केला जाऊ शकतो, असे एएनआयला त्यांनी सांगितलेय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयोजित करण्यात आली आहे. या सामन्याच्या तारखेत बदल होऊ शकते. 15 ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा पहिला दिवस आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेनं या सामन्याच्या तारखेत बदल करण्याबाबत सूचना केली आहे. याबाबत चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
फक्त तारीख बदलणार, मैदान नाही
BCCI सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची फक्त तारीख बदलली जाऊ शकते, ठिकाण तेच राहणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पुडील दोन ते तीन दिवसांत नव्या तारखेंची घोषणा केली जाऊ शकते. आयसीसी अधिकृत विश्वचषकाचे वेळापत्रक जारी करणार आहे.
गेल्या महिन्यात आयसीसी आणि बीसीसीआयने विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअमवर आयोजित करण्यात आलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यामुळे अहमदाबाद येथील हॉटेल्सच्या दरातही वाढ झाली. विमानाची तिकिटेही वाढली इतकच काय लोकांनी रुग्णालयात बेड बूक करण्यास सुरुवात केली होती. चाहत्यांना अनेक आव्हानाचा सामना करावा लागला, आता आणखी एक मोठं आव्हान चाहत्यांसमोर उभं राहण्याची शक्यता आहे. सामन्याच्या तारखेत बदल झाला तर सर्व नियोजन पुन्हा एकदा करावे लागणार आहे. राहण्यापासून ये-जा करण्यापर्यंतची बुकिंग करावी लागणार आहे.
दरम्यान, आयसीसीच्या सुत्रांनी सांगितले की, यावर चर्चा करावी लागेल. जर सामन्यात बदल करायचा असेल तर त्यावरही चर्चा करावी लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे, पण चाहत्यांना राहणे आणि प्रवासात बदल करावा लागणार आहे. याबाबत चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. दरम्यान, भारतची विश्वचषकाची मोहिम 8 ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईमध्ये सामना होणार आहे. पाकिस्तानचे दोन सामने हैदराबादमध्ये होणार आहेत. 6 आणि 12 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान हैदराबादमध्ये दोन सामने खेळणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एक दिवस आधी झाला तर पाकिस्तानला सराव करण्यासाठी फक्त एक दिवसाचा अवधी मिळणार आहे.