IND vs ENG: इंग्लंडने भारताला 229 धावांत रोखले, रोहित-सूर्याचा संघर्ष, विराट-अय्यर फ्लॉप
IND vs ENG Innings Report: लखनौच्या इकाना स्टेडियमवर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 9 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली.
IND vs ENG Innings Report: लखनौच्या इकाना स्टेडियमवर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 9 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माने 87 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय सूर्यकुमार यादव 49 आणि केएल राहुल 39 यांनी मोलाचं योगदान दिले. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी एकही मोठी भागिदारी करता आली नाही. इंग्लंडकडून डेविड विली याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. ख्रिस वोक्स आणि अदील रशीद यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. इंग्लंडला विजयासाठी 230 धावांचे माफक आव्हान आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून यजमान भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना स्वस्तात तंबूत पाठवले. गिल, विराट आणि श्रेयस अय्यर यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. विराट कोहलीला 9 चेंडूचा सामना केल्यानंतरही खाते उघडता आले नाही. विराट कोहली विश्वचषकात पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. शुभमन गिल याने 13 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या. श्रेयस अय्यर याने 16 चेंडूचा सामना केला, पण फक्त चार धावा काढून तंबूत परतला. एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार रोहित शर्मा याने संयमी फलंदाजी केली.
आघाडीचे तीन फलंदाज झटपट तंबूत परतल्यानंतर रोहित शर्माने केएल राहुलच्या साथीने भारताचा डाव सावरला. रोहित शर्मा आणि राहुल यांच्यामध्ये 91 धावांची भागिदारी झाली. ही भारताकडून सर्वात मोठी भागिदारी होय. 40 धावांवर तीन विकेट गेल्यानंतर रोहित आणि राहुल यांनी डाव सावरला. राहुल याला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. केएल राहुल याने 58 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 39 धावांचे योगदान दिले.
केएल राहुल बाद झाल्यानंतर रोहित शर्माही फारकाळ मैदानात टिकला नाही. रोहित शर्मा याने 101 चेंडूत 87 धावांचे योगदान दिले. रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. रोहित शर्माच्या खेळीमध्ये 10 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने याने भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण रविंद्र जाडेजाकडून त्याला साथ मिळाली नाही. रविंद्र जाडेजा याने 13 चेंडूत फक्त 8 धावा केल्या. जाडेजा बाद झाल्यानंतर मोहम्मद शामीही एका धावेवर बाद झाला. त्यानंतर सूर्याने जसप्रीत बुमराहाला साथीला घेत डावाला आकार दिला. अखेरीस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सूर्या तंबूत परतला. सूर्यकुमार यादव याने 47 चेंडूत 49 धावांची महत्वाची खेळी केली. सूर्यकुमार यादव याने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगवला.
सूर्या बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव लवकर आटोपणार असेच इंग्लंडला वाटले. पण जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी अखेरपर्यंत झुंज दिली. कुलदीप यादव आणि बुमराह यांच्यामध्ये 22 चेंडूत 21 धावांची महत्वाची भागिदारी झाली. जसप्रीत बुमराह याने 25 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 16 धावांची खेळी केली. कुलदीप यादव याने 13 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 9 धावा जोडल्या.
इंग्लंडकडून डेविड विली याने भेदक मारा केला. विली याने 10 षटकात 45 धावा खर्च करत तीन फलंदाजांना बाद केले. त्याने दोन षटकेही निर्धाव फेकली. ख्रिस वोक्स आणि अदील रशीद यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. मार्क वूड याने एक विकेट घेतली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाच षटके निर्धाव फेकली.