Ind vs Nz Squad : भारताविरुद्ध मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, वनडे संघाचा कर्णधार बदलला, टीममधून मोठी नावे गायब, पाहा Squad
New Zealand Squad For India Tour : न्यूझीलंड क्रिकेटने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी वनडे आणि टी-20 संघ जाहीर केले आहेत.

New Zealand Announces T20I ODI Squad For India Tour : न्यूझीलंड क्रिकेटने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी वनडे आणि टी-20 संघ जाहीर केले आहेत. या दौऱ्याची सुरुवात 11 जानेवारीपासून वडोदऱ्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार असून, त्यानंतर 21 जानेवारीपासून नागपूरमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
युवा चेहऱ्यांना मोठी संधी
या दौऱ्यासाठी न्यूझीलंडने अनेक तरुण आणि अनकॅप्ड खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज जेडन लेन्नॉक्स याची सीनियर संघात प्रथमच निवड झाली असून, तो वनडे संघाचा भाग असणार आहे. त्याच्यासोबत ऑलराउंडर क्रिस्टियन क्लार्क, लेग-स्पिनिंग ऑलराउंडर अदिथ्या अशोक, ऑलराउंडर जोश क्लार्कसन आणि वेगवान गोलंदाज मायकेल रे यांनाही संधी मिळाली आहे. मायकेल रे याने नुकतेच वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
वनडे संघाला नवा कर्णधार
वनडे संघाची कर्णधारपदाची धुरा मायकेल ब्रेसवेल याच्याकडे सोपवण्यात आली आहे. नियमित कर्णधार मिचेल सँटनर सध्या ग्रोईन दुखापतीतून सावरत असल्याने तो वनडे मालिकेला मुकणार आहे. मात्र टी-20 मालिकेत सँटनरच संघाचे नेतृत्व करणार आहे.
New Zealand have locked in their squads for their white-ball cricket tour to India! ⚫️
— Star Sports (@StarSportsIndia) December 23, 2025
Jayden Lennox gets his maiden international call-up. No #KaneWilliamson in the ODI squad. 👀#INDvNZ 👉 1st ODI 👉 SUN, 11th JAN 2026 12.30 PM onwards pic.twitter.com/2FJOYdrQ5q
टी-20 मध्ये नवे चेहरे, पण दिग्गजांचे पुनरागमन
टी-20 संघात पॉवर हिटर बेवॉन जेकब्स आणि टिम रॉबिन्सन हे नवे चेहरे दिसणार आहेत. तसेच मार्क चॅपमन आणि मॅट हेन्री यांची संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघेही अनुक्रमे अँकल आणि कॅल्फ दुखापतीतून बरे झाले आहेत. मात्र मॅट हेन्री वनडे मालिकेत खेळणार नाही, जेणेकरून तो टी-20 मालिका आणि आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी पूर्णतः तंदुरुस्त राहू शकेल.
केन विलियम्सन वनडे मालिकेतून बाहेर...
स्टार फलंदाज केन विलियम्सन वनडे मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे. तो दक्षिण आफ्रिकेतील एसए20 लीगमध्ये डरबन सुपरजायंट्सकडून खेळणार आहे. याशिवाय नाथन स्मिथ, विलियम ओ’रूर्के आणि ब्लेअर टिक्नर हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. टॉम लॅथम देखील वनडे मालिकेत सहभागी होणार नाही. दुसरीकडे, रचिन रवींद्र आणि जेकब डफी यांना वनडे क्रिकेटमधून विश्रांती देण्यात आली आहे.
न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ -
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदी अशोक, ख्रिश्चन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, जॅक फॉक्स, मिच हे (यष्टीरक्षक), काइल जेमिसन, निक केली, जेडेन लेनोक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग.
न्यूझीलंडचा टी-20 संघ -
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), जेकब डफी, जॅक फॉक्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेव्हॉन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, ईश सोधी.





















