Mohammad Shami : मोहम्मद शमीचं ठरलं, भारतीय संघात कमबॅकसाठी प्लॅनिंग सुरु, पहिल्यांदा 'या' संघाकडून खेळणार
Mohammad Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी लवकरच मैदानावर कमबॅक करण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी भारतीय संघात खेळण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होईल.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच ड्रॉ झाली आहे. दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरत आहे. मोहम्मद शमी (Mohammad Shami) गेल्या 9 महिन्यांपासून भारतीय क्रिकेटपासून दूर आहे. भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीला दुखापतीचा सामना करावा लागला होता. मोहम्मद शमी भारतीय संघात बांगलादेश दौऱ्यात कमबॅक करेल, अशा चर्चा आहेत. आता मोहम्मद शमीनं भारतीय संघात कमबॅकचा प्लॅन सांगितला आहे.
मोहम्मद शमी म्हणाला की क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. संघात पुनरागमन कधी करणार हे माहिती नाही. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्यापूर्वी बंगालच्या संघाकडून खेळणार असल्याचं मोहम्मद शमी म्हणाला. तुम्ही मला बंगालच्या जर्सीमध्ये पाहाल, मी बंगालकडून 2-3 सामने खेळणार आहे. पूर्ण तयारीनं मैदानात उतरणार असल्याचं देखील मोहम्मद शमी म्हणाला.
मोहम्मद शमीच्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट संघात तो परतण्याअगोदर बंगालच्या संघाकडून देशांतर्गत सामने खेळणार असल्याचं स्पष्ट झालंय.देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुढील हंगामात खेळल्यानंतर मोहम्मद शमी संघात परतू शकतो.
मोहम्मद शमीनं यावेळी दुखापतीवर देखील भाष्य केलं. इतकी मोठी दुखापत असेल, असं वाटलं नसल्याचं शमी म्हणाला. टी 20 वर्ल्ड कप नंतर या दुखापतीवर उपचार करण्याबाबत विचार होता. मात्र, वनडे वर्ल्ड कपमध्ये दुखापत गंभीर झाल्यानं उपचार करावा लागला, असं शमी म्हणाला. मोहम्मद शमी यानं 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यानं 7 मॅचमध्ये 24 विकेट घेतल्या होत्या.
मोहम्मद शमीनं भारतीय क्रिकेट संघाकडून कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये खेळला आहे. मोहम्मद शमीनं भारतीय संघाकडून 64 कसोटी, 101 एकदिवसीय सामने आणि 23 टी 20 सामने खेळले आहेत. शमीनं कसोटीत 229, वनडे मध्ये 195 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून दूर
मोहम्मद शमीनं भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला होता. वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर मोहम्मद शमी दुखापतीवर उपचार करण्यापासून गेल्या 9-10 महिन्यांपासून दूर आहे.
संबंधित बातम्या :