IPL 2026 Auction : लिलावात 3 खेळाडूंसाठी MS धोनी सर्व ताकद लावणार पणाला! 2 परदेशी तर...; CSK च्या ‘टार्गेट’वर कोणते प्लेयर?
Chennai Super Kings IPL 2026 Auction : आयपीएल 2026 साठीचा मिनी ऑक्शन येत्या 16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये पार पडणार आहे.

Chennai Super Kings IPL 2026 Auction : आयपीएल 2026 साठीचा मिनी ऑक्शन येत्या 16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये पार पडणार आहे. चेन्नई सुपर किंग्जकडे या ऑक्शनसाठी 43.4 कोटी रुपयांचा पर्स उपलब्ध आहे. या बजेटमधून सीएसके जास्तीत जास्त 9 खेळाडू खरेदी करू शकते. सध्या सीएसकेच्या संघात 4 विदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे ऑक्शनमध्ये संघ जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडूंची खरेदी करू शकतो. तर जाणून घ्या कोणते 3 खेळाडू असू शकतात सीएसकेच्या रडारवर?
लियाम लिव्हिंगस्टोन
इंग्लंडचा ऑलराउंडर लियाम लिव्हिंगस्टोनची बेस प्राइस 2 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी तो चॅम्पियन संघ आरसीबीचा भाग होता, मात्र आरसीबीने त्याला रिलीज केले. चेन्नई सुपर किंग्जची नजर त्याच्यावर असू शकते, कारण संघाला एका दमदार फिनिशरची गरज आहे. जरी एम.एस. धोनी आगामी हंगामात खेळणार असले, तरी संघ भविष्यासाठीही पर्याय शोधू पाहत आहे.
32 वर्षीय लिव्हिंगस्टोनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 112 सामने खेळले असून 1051 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 158.76 आहे. तसेच आयपीएलमध्ये त्याने 13 विकेटही घेतल्या आहेत, त्यामुळे तो सीएसकेला स्पिन गोलंदाजीचाही एक पर्याय देऊ शकतो.
रवि बिश्नोई
गेल्या वर्षी लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळलेला रवि बिश्नोईही सीएसकेच्या रडारवर असू शकतो. संघाला एक दर्जेदार लेग-स्पिनर हवा आहे आणि रविची बेस प्राइस 2 कोटी रुपये आहे. 2020 पासून आयपीएल खेळणाऱ्या बिश्नोईने PBKS आणि LSG या दोन संघांसाठी एकूण 77 सामने खेळले आहेत आणि 72 विकेट घेतल्या आहेत. डेथ ओव्हर्समध्येही तो प्रभावी गोलंदाजी करतो, त्यामुळे सीएसके त्याच्यासाठी बोली लावू शकते.
मॅट हेन्री
न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याच्यावरही सीएसके दाव लावू शकते. त्याची बेस प्राइसही 2 कोटी रुपये आहे. 33 वर्षीय हेन्री पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळलेला आहे. जरी आयपीएल करिअर फार काही विशेष राहिले नसले, तरी अलीकडच्या काळात त्याने उत्तम गोलंदाजी केली आहे आणि त्यामुळे सीएसके त्याला आपल्या टीममध्ये घेण्याचा विचार करू शकते.
सीएसकेने 16 खेळाडूंवर 81.6 कोटी रुपये केले खर्च...
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने एकूण 16 खेळाडूंना कायम ठेवले, ज्यात संजू सॅमसनचाही समावेश होता, ज्याची खरेदी-विक्री झाली. त्यांनी सर्व खेळाडूंवर त्यांच्या पर्समधून 81.6 कोटी रुपये खर्च केले आहेत. सीएसकेकडे आता 43.4 कोटी रुपये शिल्लक आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज रिटेन्शन लिस्ट
भारतीय : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, मुकेश चौधरी, रामकृष्ण घोष, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, खलील अहमद, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, संजू सॅमसन (खरेदी).
परदेशी : जेमी ओव्हरटन, नाथन एलिस, नूर अहमद, डेवाल्ड ब्रेविस.





















