IPL 2025: जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडणार?; हरभजन सिंगने केलेल्या विधानाने खळबळ
IPL 2025 Jasprit Bumrah: आयपीएल 2025 च्या स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.
IPL 2025 Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाची साथ सोडण्याच्या तयारी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने केलेल्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
आयपीएल 2025 च्या स्पर्धेची (IPL 2025) उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. लवकरच मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआयने (BCCI) एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर कोणते खेळाडू कोणत्या संघात जाणार?, फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार?, याबाबत चर्चा रंगल्या असताना हरभजन सिंगचं वक्तव्य समोर आलं आहे.
हरभजन सिंग काय म्हणाला?
जसप्रीत बुमराहने यंदाच्या आयपीएलच्या मेगा लिलावात सहभाग घेतल्यास तो सर्वात महागडा खेळाडू ठरेल. तसेच जसप्रीत बुमराहला टॅग करत तुला मान्य आहे का?, असा सवालही हरभजन सिंगने विचारला. हरभजन सिंगची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
If @Jaspritbumrah93 put himself in the Auction . we will be the highest paid IPL player in the history of IPL ! Agree people ? pic.twitter.com/5iqhUvUKMV
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 29, 2024
जसप्रीत बुमराहने दिली नाही प्रतिक्रिया-
जसप्रीत बुमराहने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र असे झाले तर तो लिलावात सहभागी झाला तर आयपीएलच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत निघतील, यात शंका नाही. तसेच विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांनीही लिलावात भाग घेतल्यास आयपीएलच्या इतिहासात अनेक विक्रमांची नोंद होईल.
सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार?
टीम इंडियाचा टी-20 चा कर्णधार झालेला सूर्यकुमार यादवही मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तसेच आयपीएलचा लिलावही जवळ येत आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला मोठी रक्कम खर्च करावी लागेल. तसेच पुढील हंगामापासून सूर्यकुमार यादवला कर्णधार केली जाण्याची शक्यता आहे.
पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार-
आयपीएलमधील फ्रँचायझी पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार आहे. परंतु त्यानंतर लिलावासाठी तुमच्याकडे फक्त 45 कोटी रुपये शिल्लक राहतील, ज्यामुळे त्यांना उर्वरित 20 खेळाडू खरेदी करावे लागतील. अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवता येईल. अनकॅप्ड खेळाडू कोणत्याही देशाचा असू शकतो. एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे.