Ind vs Pak : टीम इंडियाने स्पर्धेतून घेतली माघार, भारत सरकारचा मोठा निर्णय! पाकिस्तानला धक्का
फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावर अजूनही वादविवाद सुरू आहे.
Blind T20 World Cup 2024 : फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावर अजूनही वादविवाद सुरू आहे. भारत-पाकिस्तान वादामुळे आयसीसीने अद्याप या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेले संबंध आणि पाकिस्तानमधील सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता भारत सरकारने टीम इंडियाला शेजारी देशाच्या दौऱ्यावर पाठवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा घेण्याची मागणी होत आहे. या सगळ्यात पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. आणखी एका भारतीय संघाने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान ब्लाइंड टी-20 वर्ल्ड कप आयोजित करणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय ब्लाइंड संघाला टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. अशा परिस्थितीत ब्लाइंड भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कपमधून आपले नाव मागे घेतले आहे. भारतीय ब्लाइंड संघाला या स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाले होते, परंतु भारतीय संघाला पाकिस्तानला जाण्यासाठी गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचीही परवानगी दिली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडियन ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन (IBCA) सरचिटणीस शैलेंद्र यादव यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली नाही आणि स्पर्धेतून माघार घेण्यास सांगितले आहे. सरकारकडून अधिकृत मान्यता न देणारे पत्र अद्याप त्यांना मिळालेले नाही, कारण हे तोंडी कळवण्यात आले आहे.
23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये ब्लाइंड टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेची ही चौथी आवृत्ती आहे. याआधी ब्लाइंड टी-20 क्रिकेट वर्ल्ड करचे तीन सत्र झाले असून भारतीय संघाने तिन्ही जिंकले आहेत. भारतीय संघाने 2012 आणि 2017 मध्ये पाकिस्तानला हरवून हे विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, 2022 मध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावरूनही पेटला वाद
भारताचा मुख्य संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाहीये. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे. पण टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. या मुद्द्यावरून बराच वाद झाला आहे. पाकिस्तानने अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आक्षेपानंतर तो रद्द करावा लागला.
हे ही वाचा -