IND vs AFG: आशिया चषक स्पर्धेत मोठा उलटफेर; सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने टीम इंडियाला लोळवलं, फायनलचं तिकीट मिळवलं!
IND vs AFG Semifinal: उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम खेळताना 206 धावांची मोठी मजल मारली होती.
India vs Afghanistan Semifinal Emerging Teams Asia Cup 2024: इमर्जिंग टीम्स आशिया चषकात अफगाणिस्तान क्रिकेट संघाने भारताचा पराभव केला आहे. अफगाणिस्तान आणि भारत काल उपांत्य फेरीचा सामना खेळण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तानने भारताचा 20 धावांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या पराभवामुळे भारताला चांगलाच धक्का बसला आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम खेळताना 206 धावांची मोठी मजल मारली होती. मात्र प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 186 धावाच करू शकला. रमणदीप सिंगने शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारत 64 धावांची तुफानी खेळी खेळली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
🚨 HISTORY CREATED IN OMAN. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 25, 2024
- AFGHANISTAN BEAT INDIA IN THE EMERGING ASIA CUP SEMI FINAL...!!!! 🤯 pic.twitter.com/fP82qBQTow
सामना कसा राहिला?
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने झुबैद अकबरी आणि सेदिकुल्लाह अटल यांनी 137 धावांची सलामीची भागीदारी केल्याने चांगली सुरुवात झाली. अकबरीने 64 धावा केल्या, तर अटलने 83 धावांची जलद खेळी केली. त्यानंतर अखेरच्या षटकांत करीम जन्नतने भारताच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. करीम जन्नतने 20 चेंडूत 41 धावा केल्या. या खेळीमुळे अफगाणिस्तानच्या संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.
टीम इंडियाला धक्का-
या स्पर्धेत टीम इंडिया अंतिम फेरीपर्यंत पोहचून चषक जिंकेल असा दावा करण्यात येत होता. मात्र अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत पराभूत केल्याने भारताला खूप मोठा धक्का बसला आहे. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली कारण अभिषेक शर्मा अवघ्या 7 धावा करून बाद झाला. प्रभसिमरन सिंग 19 धावांवर माघारी परतला. कर्णधार तिलक वर्मालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारताने 48 धावात तीन विकेट्स गमावल्या होत्या. आयुष बडोनी आणि निहाल वढेरा यांनी भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनाही त्यात अपयश आले. बडोनीने 31 तर वढेराने 20 धावा केल्या.
रमणदीप सिंगची उच्च दर्जाची खेळी-
भारताला विजयासाठी शेवटच्या 5 षटकात 85 धावा करायच्या होत्या, पण अशा परिस्थितीत रमणदीप सिंग आशेचा किरण बनून क्रीजवर उभा होता. रमणदीपने चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली आणि 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत तो झुंजत राहिला, मात्र त्याची 34 चेंडूत 64 धावांची खेळी भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.