IND vs ZIM : अभिषेक शर्मा अन् रिंकू सिंग शुन्यावर बाद, टीम इंडियाची पॉवरप्लमध्ये घसरगुंडी, झिम्बॉब्वे विजयाच्या वाटेवर, भारत पराभवाच्या छायेत
IND vs ZIM : झिम्बॉब्वेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतापुढं विजयासाठी 116 धावांचं लक्ष ठेवलंय. भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली.
IND vs ZIM हरारे : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पहिला टी 20 सामना हरारेमध्ये सुरु आहे. भारतीय गोलंदाजांनी झिम्बॉब्वेला 115 धावांवर रोखलं. रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं ही कामगिरीक केली. मात्र, झिम्बॉब्वेनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीला मोठे धक्के बसले. टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माला खातं देखील उघडता आलं नाही. तर, अनुभवी ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. आज पदार्पण करणाऱ्या रियान परागला देखील चांगली कामगिरी करता आली नाही. झिम्बॉब्वेच्या चटाया, बेनेट अन् ब्लेसिंग मुजरबानी भारताला पॉवरप्लेमध्ये बॅकफुटवर ढकललं. यानंतर ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल बाद झाल्यानं भारतीय संघ पराभवाच्या छायेत ढकलला गेला आहे.
अभिषेक शर्मा अन् रिंकू सिंग शुन्यावर बाद
भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, तो आज चांगली कामगिरी करु शकला नाही. ब्रायन बेनेट्ट च्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा बाद झाला. यानंतर टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू ऋतुराज गायकवाड देखील फारशी चमक दाखवू शकला नाही. तो केवळ 7 धावा करुन बाद झाला. रियान परागनं देखील अपेक्षाभंग केला. परागला झिम्बॉब्वेच्या चटारानं 2 धावांवर असताना बाद केलं. यानंतर फलंदाजीला आलेल्या अनुभवी खेळाडू रिंकू सिंगकडून खूप अपेक्षा भारतीय संघाला होत्या. मात्र, तो देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चटाराच्या गोलंदाजीवर बाद झाला. झिम्बॉब्वेच्या आक्रमक गोलंदाजीमुळं भारताला पॉवरप्लेमध्ये 4 विकेटवर 28 धावा करता आल्या.
झिम्बॉब्वेची आक्रमक गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांनी झिम्बॉब्वेच्या संघाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 115 धावांवर रोखलं होतं. भारतीय संघ सहजपणे हे लक्ष्य पार करेल असं वाटत असताना सुरुवातीला मोठे धक्के बसले. बेनेट, चटारा आणि मुजरबानी यांनी सुरुवातीला चार धक्के दिले. यानंतर शुभमन गिल अन् ध्रुव जुरेल यांच्यात भागिदारी होतेय असं वाटत असताना भारताला आणखी एक धक्का बसला. ध्रुव जुरेल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. जोंगवेनं त्याला बाद केलं.
भारताची वाट खडतर
भारतानं 43 धावांवर पाचवी विकेट ध्रुव जुरेलच्या रुपात गमावली. दुसरीकडे कॅप्टन शुभमन गिलवर संघाची जबाबदारी येऊन पडली मात्र तो देखील 31 धावांवर बाद झाला.
संबंधित बातम्या :