(Source: Poll of Polls)
Rohit Sharma: आजचा दिवस रोहित शर्मासाठी खूप खास, पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी करून रचले अनेक विक्रम
IND vs PAK: भारताचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) जगातील आक्रमक फलंदाजांच्या यादीत गणना केली जाते. त्यानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातलीय.
IND vs PAK: भारताचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) जगातील आक्रमक फलंदाजांच्या यादीत गणना केली जाते. त्यानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातलीय. त्यापैकी काही विक्रम मोडणं थोडं कठीण मानलं जातंय. दरम्यान, आजच्या दिवशी म्हणजेच 16 जून 2019 मध्ये रोहित शर्मानं पाकिस्तानच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं होतं. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्यानं 140 धावांची तुफानी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. त्याची ही खेळी कोणीच विसरू शकलेलं नाही.
एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत पाहायला मिळाली. विश्वचषकात भारत- पाकिस्तान सातव्यांदा आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम गोलंदाजी करण्याची चूक पाकिस्तानला भारी पडली आणि त्याचा पुरेपूर फायदा भारतानं घेतला. भारताचा सलामीवीर केएल राहुल (57) आणि रोहित शर्मा (140) यांनी पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. यानंतर हिटमॅननं विराट कोहली (77) सोबत 98 धावांची भागीदारी करत पाकिस्तानला बॅकफूटवर आणलं. हार्दिक पांड्यानं (26) योग्य कामगिरी केली. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचं मोठे लक्ष्य ठेवलं होतं. परंतु, या सामन्यात पावसानं व्यत्यय आणलं. या सामन्यात पाकिस्तानला 40 षटकात केवळ 212 धावा करता आल्या.
रोहित शर्माची अनेक विक्रमाला गवसणी
- रोहित शर्माला त्याच्या या स्फोटक खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोहितने पाकिस्तानविरुद्ध 14 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 140 धावांची खेळी केली.
- पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकात रोहित शर्माची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक 143 धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू सायमंड्सच्या नावावर आहे. त्यानं 2003 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 143 धावांची खेळी केली होती.
- भारतीय फलंदाज म्हणून रोहित शर्माचं विश्वचषकातील हे दुसरे जलद शतक ठरले. रोहितनं 85 चेंडूत 100 धावा केल्या. भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूनं 2011 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध 83 चेंडूत 100 धावा केल्या होत्या.
- रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये बॅक टू बॅक सेंच्युरी करणारा पहिला खेळाडू ठरला. विश्वचषक 2019 पूर्वी रोहित शर्मानं आशिया कप 2018 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक केलं होतं. त्यावेळी रोहितनं 111 धावांची नाबाद खेळी केली होती.
- आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. रोहितपूर्वी कोहलीनं 2015 मध्ये या संघाविरुद्ध 107 धावा केल्या होत्या.
हे देखील वाचा-