(Source: Poll of Polls)
BCCI: एका वर्षात भारतीय टी-20 संघाचे इतके कर्णधार बदलले, पाहा संपूर्ण यादी
Indian T20 Captains: दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे.
Indian T20 Captains: दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे. या आगामी मालिकेसाठी बीसीसीआयनं बुधवारी भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यानं भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. महत्वाचं म्हणजे, बीसीसीआयनं गेल्या एका वर्षात भारतीय टी-20 संघाचं अनेक कर्णधार बदलले आहेत. या कालावधीत भारतीय संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या सहावा खेळाडू ठरेल.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौरा
जुलै 2021 मध्ये, जेव्हा भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता, तेव्हा भारतीय 'ब' संघानं श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं सलामीवीर शिखर धवनकडं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. या दौऱ्यात भारताला 2-1 नं पराभव स्वीकारावा लागला होता.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं टी-20 विश्वचषक खेळला
टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर त्यानं कर्णधारपद सोडलं. कोहलीनं विश्वचषकापूर्वीच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पहिले दोन सामने हरल्यानं संघ बाद फेरीतून बाहेर पडला.
रोहित शर्माकडं सोपवली संघाची जबाबदारी
टी-20 विश्वचषकानंतर बीसीसीआयनं रोहित शर्माची टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. रोहितच्या नेतृत्वाखालील संघानं न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं आतापर्यंत एकही टी-20 सामना गमावला नाही.
केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयनं केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. परंतु, दुखापतीमुळं केएल राहुलला मालिकेतून बाहेर पडावं लागलं. राहुलनं मालिकेतून माघार घेतल्यानंतर बीसीसीआयनं यष्टीरक्षक ऋषभ पंतची कर्णधारपदी नियुक्ती केली.
आयर्लंड दोऱ्यात हार्दिक पांड्या कर्णधार
दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघाला आयर्लंडच्या दौऱ्यावर जायचंय. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. 26 जूनला या मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
हे देखील वाचा-
- Rahul Tripathi : अखेर राहुल त्रिपाठीची टीम इंडियात एन्ट्री; आयर्लंड दौऱ्यासाठी संघात नाव
- India Squad for Ireland Tour : आयपीएलमध्ये चमकणाऱ्या खेळाडूकडे दुर्लक्ष, नेटकरी भडकले
- Hardik Pandya Captain : वर्ल्डकपनंतर संघात स्थानही नसणारा पांड्या आता थेट 'कॅप्टन', आयपीएलमधील कामगिरीचं हार्दिकला बक्षिस