IND vs PAK : भारत पाकिस्तान मॅचवर यूट्युबरचा प्रश्न, सुरक्षारक्षक भडकला अन् थेट गोळी चालवली, पुढं जे घडलं ते धक्कादायक...
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 9 जूनला पार पडली. या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला.
Pakistan YouTuber Murder कराची : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील क्रिकेट मॅच सध्या केवळ आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये होत आहेत. दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असल्यानं क्रिकेटच्या मालिका बंद आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान जेव्हा आमने सामने येतात त्यावेळी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 9 जून रोजी पार पडली. भारतानं या मॅचमध्ये 6 धावांनी पाकिस्तानला (India Beat Pakistan) पराभूत केलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला. या मॅचच्या दिवशी पाकिस्तानच्या कराचीत एक धक्कादायक घटना घडली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या मॅचवर व्हिडीओ तयार करणाऱ्या एका यूट्यूबरवर एका सुरक्षारक्षकानं गोळीबार केला. या गोळीबारात कराचीत यूट्यूबरचा मृत्यू झाला. हे पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला. ज्या यूट्यूबवर गोळीबार झाला त्याचं नाव साद अहमद असं आहे.
पाकिस्तानातील मीडियाच्या रिपोर्टनुसार, साद अहमद नावाचा यूट्यूबर कराचीत मोबाइल मार्केटमध्ये गेला होता. त्यावेळी त्यानं अनेक दुकानदारांचा व्हिडीओ बाईट घेतला होता. यावेळी तो एका सुरक्षारक्षकासमोर आला. साद अहमदनं त्या सुरक्षारक्षकाला भारत पाकिस्तान मॅच संदर्भात प्रश्न विचारला. मात्र, त्या सुरक्षारक्षकाला मॅचचं काही देणं घेणं नव्हतं. यानंतर सुरक्षारक्षकानं साद अहमदला गोळी मारली.
साद अहमदमला गोळी मारल्यानंतर काही काळानंतर सुरक्षा रक्षक भानावर आला. मात्र, तोपर्यंत साद अहमदचा मृत्यू झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर साद अहमदला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. साद अहमदच्या एका मित्रानं जिओ टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार साद त्याच्या कुटुंबातील कमवणारा एकमेव व्यक्ती होता. साद अहमदचं लग्न देखील झालं होतं. त्याला दोन मुलं आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर कराचीत खळबळ उडाली होती.
सुरक्षारक्षकाला अटक
कराचीतील या घटनेसंदर्भात ARY च्या रिपोर्टनुसार पोलिसांनी 35 वर्षांच्या अहमद गुल नावाच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. अहमद गुल कराचीमध्ये बफर झोन भागात सेरीना मोबाइल मॉल बंदोबस्तासाठी तैनात होता. यावेळी त्यानं साद अहमदवर गोळीबार केला.
पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना तैमूरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. गोळीबार करणाऱ्या अहमद गुलला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत करत विजय मिळवला. भारत आणि पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 8 वेळा आमने सामने आले आहेत. भारतानं 7 वेळा तर पाकिस्ताननं 1 वेळा विजय मिळवला आहे.
संबंधित बातम्या :