IND Vs NZ : T20 मालिकेत भारताची आघाडी, दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट्सनी पराभव
T20 मालिकेत टीम इंडियाची विजयी आघाडी घेतली असून न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत भारताने सात विकेट्सनी राखून विजय मिळववा आहे.
रांची : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने मायदेशातील टी-ट्वेन्टी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला आहे. रोहित आणि राहुलच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर जयपूर पाठोपाठ रांचीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. या विजयासह प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टी-ट्वेन्टी कर्णधार रोहित शर्मा यांनी आपल्या मिशनची विजयी सुरुवात केली आहे.
रांचीमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. न्यूझीलंडला 20 षटकात सहा बाद 153 धावा करता आल्या. आणि भारतासमोर विजयासाठी 154 धावांचे आव्हान ठेवलं. मार्टिन गप्टिल आणि डेरेल मिशेलने न्यूझीलँडला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत किवींना मोठी धावसंख्या उभी करण्यापासून रोखलं. टीम इंडियाचा गोलंदाज हर्षल पटेलने पदापर्णाच्या सामन्यात प्रभावी मारा करत 25 धावांत दोन गडी बाद केलं.
न्यूझीलंडने दिलेलं लक्ष्य भारताने केवळ 17.2 षटकांमध्ये तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. केएल राहुलने 49 चेंडूंमध्ये 65 धावा करताना सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर, रोहितने एक चौकार आणि पाच षटकारांची टोलेबाजी करताना 36 चेंडूंत 55 धावांची झंझावाती खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
WHAT. A. WIN! 👏 👏#TeamIndia secure a 7⃣-wicket victory in the 2nd T20I against New Zealand & take an unassailable lead in the series. 👍 👍 #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 19, 2021
Scorecard ▶️ https://t.co/9m3WflcL1Y pic.twitter.com/ttqjgFE6mP
हेड टू हेड
टी 20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ टीम इंडियावर वरचढ ठरला आहे. दोन्ही संघांनी आमनेसामने 19 सामने खेळले आहेत. त्यापैकी नऊ सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत तर भारताने आठ सामने जिंकले आहेत.
पाच वर्षात टीम इंडियाचा 10 मालिका विजय
2016 सालापासून भारतीय संघानं आपल्या भूमीत मागील 11 टी20 इंटरनॅशनल मालिकेतील 10 मालिका जिंकल्या आहेत. सोबतच मागील सलग चार मालिका टीम इंडियानं जिंकल्या आहेत.
संबंधित बातम्या :
- न्यूझीलॅंडचे टीम इंडियाला 154 धावांचे आव्हान; भारताच्या हर्षल पटेलचे स्वप्नवत पदार्पण
- T20 Ind vs NZ : राहुल द्रविड 'इन अॅक्शन', सामना सुरु होण्यापूर्वी केली खेळपट्टीची पाहणी
- Ind vs NZ : दीपक चहरची खुन्नस अन् व्यंकटेश प्रसादची आठवण; प्रसादने पाकिस्तानच्या सोहेलला त्याची जागा दाखवली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha