IND Vs AUS | टीम इंडियाला धक्का; ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही बुमराह
IND Vs AUS : ब्रिस्बेन कसोटीत विहारी अन् जाडेजा दुखापतीमुळे संघातून बाहेर असणार आहेत. अशातच आता या दोघांपाठोपाठ संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
IND Vs AUS | ब्रिस्बेन कसोटी सामन्यााधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह 15 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराह शेवटच्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचा दावा बीसीसीआयच्या सुत्रांनी केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका अहवालानुसार, जसप्रीत बुमराह पोटाच्या समस्येने त्रस्त आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, दुसऱ्या डावात बुमराह मैदानातून बाहेर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. काही काळाने बुमराह मैदानात परत आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजीही केली होती.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थिती टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूला संधी मिळणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. याव्यतिरिक्त टी नटराजन किंवा कार्तिक त्यागी चौथ्या कसोटीत डेब्यू करण्याची शक्यता आहे.
जाडेजा-विहारीही सामन्याबाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंच्या फिटनेसची समस्या वाढत चालली आहे. सिडनीतील ड्रॉ केलेल्या तिसर्या कसोटी सामन्याचा हिरो हनुमा विहारी हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यानंतर विहारीला स्कॅन करण्यासाठी नेण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल अपेक्षित आहे.
ऋषभ पंतनेही तिसऱ्या कसोटीत 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. हनुमा विहारी आणि ऋषभ पंत या दोघांनीही फलंदाजी सुरू ठेवण्यासाठी पेन किलर औषधे दिले गेले होते. त्याचबरोबर ब्रिस्बेन कसोटीत शार्दुल ठाकूर रवींद्र जाडेजाची जागा घेऊ शकतो. जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चरमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून तो बाहेर पडला आहे.
दरम्यान, सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी ऐतिहासिक ड्रॉ झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 41 वर्षानंतर चौथ्या डावात भारताने 110 पेक्षा जास्त षटके फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या 407 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 131 षटके खेळल्यानंतर कसोटी ड्रॉ झाली.
महत्त्वाच्या बातम्या :
- India vs Australia, Sydney Test Records: 41 वर्षांनंतर टीम इंडियाने चौथ्या डावात खेळल्या 110 ओव्हर्स; आणखी काही रेकॉर्ड्सची नोंद
- वयाच्या 10व्या वर्षी वडीलांचं छत्र हरपलं, तरीही खेळला सामना; कोहलीशी मिळतीजुळीती विहारी हनुमाची कहाणी
- हनुमा विहारी चौथ्या कसोटीतून बाहेर, जाडेजाच्या जागी 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
- BLOG : ये ड्रॉ जीत के बराबर है..