(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDvsAUS: हनुमा विहारी चौथ्या कसोटीतून बाहेर, जाडेजाच्या जागी 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
स्कॅनच्या अहवालानंतरच विहारीच्या दुखापतीविषयी माहिती मिळू शकेल. पण ग्रेड वनच्या दुखापतीनंतरही त्याला चार आठवड्यांसाठी बाहेर राहावे लागेल आणि त्यानंतर त्याचे रिहॅबिलीटेशन करावे लागेल.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंच्या फिटनेसची समस्या वाढत चालली आहे. सिडनीतील ड्रॉ केलेल्या तिसर्या कसोटी सामन्याचा हिरो हनुमा विहारी हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यानंतर विहारीला स्कॅन करण्यासाठी नेण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल अपेक्षित आहे.
येत्या 15 जानेवारीपासून सुरू होणार्या पुढील सामन्यापर्यंत विहारी फिट होऊ शकणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले आहे. हनुमा विहारीने आर अश्विनच्या साथीने 161 चेंडूत 23 धावा करून सिडनी कसोटी ड्रॉ करण्याची महत्वाची भूमिका निभावली.
सूत्रांच्या माहितीनुसार, स्कॅनच्या अहवालानंतरच विहारीच्या दुखापतीविषयी माहिती मिळू शकेल. पण ग्रेड वनच्या दुखापतीनंतरही त्याला चार आठवड्यांसाठी बाहेर राहावे लागेल आणि त्यानंतर त्याचे रिहॅबिलीटेशन करावे लागेल. केवळ ब्रिस्बेन कसोटीच नाही तर त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर राहावे लागू शकते.
देशांतर्गत मालिकेत भारतीय संघ जादा गोलंदाजांसह उतरणे पसंत करतो. म्हणूनच प्लेईंग इलेव्हनमध्ये विहारीची निवड होण्याची शक्यता फारच कमी होती. विहारीच्या जागी पर्याय म्हणून रिद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून आणि ऋषभ पंतला फलंदाज म्हणून किंवा मयंक अग्रवालला मधल्या फळीत स्थान दिलं जाऊ शकतं.
ऋषभ पंतनेही तिसऱ्या कसोटीत 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. विहारी आणि ऋषभ पंत या दोघांनीही फलंदाजी सुरू ठेवण्यासाठी पेन किलर औषधे दिले गेले होते. त्याचबरोबर ब्रिस्बेन कसोटीत शार्दुल ठाकूर रवींद्र जाडेजाची जागा घेऊ शकतो. जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चरमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून तो बाहेर पडला आहे.