IND vs SA 4th T20 : आजचा सामना होणाऱ्या मैदानातील रेकॉर्ड्स फलंदाजांसाठी फायद्याचे, कशी असेल दोन्ही संघाची रणनीती?
India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेत सध्या दक्षिण आफ्रिका 2-1 च्या फरकाने आघाडीवर असल्याने भारत आज विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.
IND vs SA : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा सामना आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशनच्या मैदानात पार पडणार आहे. आतापर्यंत या मैदानावर झालेल्या सामन्यांचा विचार करता मैदानाची खेळपट्टी फलंदाजासाठी अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे आज एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. याआधी या मैदानात केवळ दोन आंतरराष्ट्रीय सामने झाले असून या सामन्यातील धावसंख्या पाहता आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.
याआधी या मैदानावर झालेला पहिला एकदिवसीय सामना इंग्लंड आणि भारत यांच्यात पार पडला होताय या सामन्यात इंग्लंडने 325 धावा ठोकल्या. पण भारताला मात देण्यापासून 9 धावा कमी राहिल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. तर दुसरा या मैदानावर पार पडलेला सामना हा टी20 सामना होता. यावेळी ऑरॉन फिंचच्या 89 धावांच्या जोरावर इंग्लंडने 202 धावांचे आव्हान भारताला दिले. पण युवराज सिंहच्या 35 चेंडूत 77 धावांच्या जोरावर दोन बॉल ठेवून भारताने हा सामना जिंकला. त्यामुळे या मैदानावर एक दमदार धावसंख्या आजही उभा राहू शकते, जी प्रतिस्पर्धी संघ चेस करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेऊन एक अत्यंत मोठे टार्गेट समोरच्या संघाला देण्याच्या तयारीत असणार आहे.
कशी असू शकते भारताची अंतिम 11?
ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक.
भारत टी20 मध्ये सरस
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 17 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आठ सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. आता देखील मालिकेतील पहिले दोन सामने आफ्रिकेने जिंकत मालिकेत वर्चस्व मिळवलं आहे.