(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी सौरव गांगुलीने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र; सलामीच्या जोडीचं नाव सुचवलं!
ICC T20 World Cup 2024: आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी भारतीय संघाला महत्वाचा गुरुमंत्र दिला आहे.
ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा थरार 1 जूनपासून रंगणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. हा सामना 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होईल. तर भारताचा दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय संघातील बहुतांश खेळाडू आयपीएल 2024 मध्ये खेळत आहेत. आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक होणार आहे.
आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी भारतीय संघाला महत्वाचा गुरुमंत्र दिला आहे. भारतीय संघाने निर्भयपणे खेळणे आवश्यक आहे. भारतीय संघाने बाहेर जाऊन आक्रमक खेळ करणे महत्त्वाचे आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या हे सर्व अपवादात्मक प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांची षटकार मारण्याची क्षमता जबरदस्त आहे. संघ निवडताना संतुलन राखणे महत्त्वाचं असल्याचं गांगुली यांनी सांगितले.
संघ निवडताना संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. मला विचाराल तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 विश्वचषकात सलामीला खेळायला हवे. विराटमध्ये 40 चेंडूत शतक झळकावण्याची क्षमता आहे. टी-20 क्रिकेट खेळण्यासाठी वय किंवा तरुण असा कोणताच नियम नाही. जेम्स अँडरसन अजूनही कसोटी खेळतो आणि कसोटीत 30 षटके टाकतो. महेंद्रसिंग धोनी अजूनही खणखणीत षटकार मारतो आणि दोघांनीही वयाची चाळिशी ओलांडली आहे, असं मत सौरव गांगुली यांनी व्यक्त केलं. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान सौरव गांगुली यांनी यावर भाष्य केलं.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
गटवारी
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
संबंधित बातम्या:
राजस्थान अव्वल स्थानी कायम, मुंबई सातव्या क्रमांकावर; जाणून घ्या, आयपीएलचे Latest Points Table
'मला अजिबात आवडत नाही...'; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?