ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा
ICC T20 World Cup 2024: आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. यासाठी काही खेळाडूंचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे.
ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा थरार 1 जूनपासून रंगणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. हा सामना 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होईल. तर दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय संघातील बहुतांश खेळाडू आयपीएल 2024 मध्ये खेळत आहेत. आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. यासाठी काही खेळाडूंचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकात खेळणार आहे.
टी-20 विश्वचषकांत कर्णधार रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी येईल. याबाबत रोहितने अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. मात्र ही सर्व अफवा आहे, असं सांगत रोहितने याबाबत नकार दिला. पण सध्याची कामगिरी पाहता आगामी टी 20 विश्वचषकासाठी काही खेळाडूंचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. रोहितसोबत जसप्रीत बुमराह देखील मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीनेही आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे.
हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये नाही. हार्दिक आयपीएल 2024 मध्ये तो काही विशेष करू शकला नाही. जर पांड्या फॉर्ममध्ये परतला तर त्याला टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते. मात्र सध्या संशयाची स्थिती आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल बोलायचे झाले तर त्यालाही भारतीय संघात स्थान मिळू शकते. पंतने 7 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 210 धावा केल्या आहेत आणि 2 अर्धशतके केली आहेत. पंतची सर्वोत्तम धावसंख्या 55 धावा आहे. भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला टी-20 विश्वचषकासाठी संधी देऊ शकते.
पात्र ठरलेले 20 संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
गटवारी
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
संबंधित बातमी:
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video