ICC T-20 World Cup 2024: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video
Pat Cummins On ICC T-20 World Cup 2024: आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत विश्वचषक पटकावलं होतं.
ICC T-20 World Cup 2024: आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup)ची स्पर्धा 2 जूनपासून सुरु होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.
टी-20 विश्वचषकासाठी (ICC T-20 World Cup 2024) भारतीय सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे इतर देशांनी देखील 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेत उतरणार आहे. भारतीय संघ विश्वचषक मोहिमेची सुरुवात आयर्लंडविरुद्ध करणार आहे. भारत आणि आयर्लंडचा सामना 5 जून रोजी होणार आहे. यानंतर टीम इंडिया 9 जून रोजी दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत विश्वचषक पटकावलं होतं. टी-20 विश्वचषकमध्ये देखील ऑस्ट्रेलियाचा संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. याचदरम्यान पॅट कमिन्सने भारतात केलेल्या एका विधानाची चर्चा सध्या रंगली आहे. भारतात दिलेल्या एका मुलाखतीत पॅट कमिन्सला विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नक्कीच ऑस्ट्रेलिया, बाकी 3 संघ तुम्ही निवडा, असं पॅट कमिन्सने उत्तर दिलं. यानंतर तुम्ही कोणते संघ निवडाल, असा पुन्हा प्रश्न केला. यावर मला पर्वा नाही, तुम्हाला जे हवेत ते निवडा, असं कमिन्सने सांगितले.
Question:- Your Top 4 teams for T20 World Cup 2024? (CNBC TV18).
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 5, 2024
Pat Cummins:- "Definitely Australia, the other 3 you can pick".
Question:- Which 3 do you want?
Pat Cummins:- "Don't care, you can pick any of them". pic.twitter.com/lNXJsxFFPR
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अर्गर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा.
जेतेपद पटकावणार संघ होणार मालामाल-
टी-20 विश्वचषक पटकावणारा संघ मालामाल होणार आहे. टी-20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम 5.6 दशलक्ष डॉलर्स आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहिली तर ती अंदाजे 46.77 कोटी रुपये येते. त्याचबरोबर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 13.36 कोटी रुपये आहे. तर उपविजेत्याला 6.68 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे.
सुपर-12 स्टेजमधून बाहेर पडलेल्या संघांना किती पैसे मिळतील?
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 3.32 कोटी रुपये मिळतील. तर सुपर-12 टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांमध्ये 5.85 कोटी रुपये वितरित केले जातील. म्हणजेच ही रक्कम सर्व संघांमध्ये विभागली जाईल. 2 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिजशिवाय अमेरिकेच्या मैदानावरही स्पर्धेचे सामने खेळवले जातील.