(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS Weather Forecast: टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात पावसाचा वरचष्मा? कसं असेल चेन्नईतील हवामान?
ODI World Cup 2023: भारताचा विश्वचषकातील पहिला सामना रविवार, 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये होणार असून आजच्या सामन्यात पाऊस पडणार तर नाही ना? ही एकच चिंता क्रिडाप्रेमींच्या मनात घर करुन आहे.
ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकाचा (ODI World Cup 2023) महासंग्राम 5 ऑक्टोबरपासून सुरू झाला असला तरी भारतातील क्रिकेट प्रेमी आजच्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत होते. त्याचं कारण म्हणजे, आजपासून टीम इंडिया (Team India) आपला विश्वचषकातील प्रवास सुरू करणार आहे. विश्वचषकात वरचष्मा असणाऱ्या ऑसी संघाविरोधात (Australia) टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील आपला पहिला सामना खेळणार आहे.
आज चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रंगणार आहे. दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. पण, 2023 मध्ये खेळवण्यात आलेल्या बहुतांश क्रिकेट सामन्यांवर पावसाची अवकृपा पाहायला मिळाली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही वरुणराजा बरसून क्रिडाप्रेमींच्या आनंदावर विरजण टाकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जाणून घेऊयात आज चेन्नईमधील हवामान कसं असेल? आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता किती आहे, त्याबाबत सविस्तर...
चेन्नईत आज कसं असेल हवामान?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चेन्नईच्या एम.ए चिदंबरम स्टेडियमवर होणार्या विश्वचषक सामन्याच्या एक दिवस अगोदर शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. तसेच, स्टेडियमच्या अवतीभोवती ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. गेल्या आठवडाभरापासून चेन्नईमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. मात्र, रविवारी खेळावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. रविवारी हवामान मोठ्या प्रमाणात स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, तर आर्द्रता 70 च्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. आजचा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून, त्यावेळी पावसाची शक्यता केवळ 8 टक्के असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचाच वरचष्मा
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या मैदानात एकमेकांविरोधात उतरणार आहेत. आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियानं विक्रमी पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे, तर टीम इंडियानं दोनदा विश्वचषक पटकावला आहे. टीम इंडियाचे धुरंधर आपल्या खेळीनं सर्वांना चकीत करतातच, पण यामध्ये ऑस्ट्रेलियाचे शिलेदारही काही कमी नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघातील काही खेळाडू टीम इंडियाचं टेन्शन नक्कीच वाढवू शकतात.
दरम्यान, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघानं काही दिवसांपूर्वी एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत कांगारूंपेक्षा भारतीय खेळाडूंचं मनोबल अधिक भक्कम असेल. सध्या भारतीय क्रिकेट संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला एकदिवसीय क्रिकेट संघ आहे. दरम्यान, आजचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. चेन्नईतील चेपॉकवर परदेशी संघानं सामने जिंकणं अशक्य असल्याचं बोललं जातं. त्यामुळे आजच्या लढतीत कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :