Dhoni in T20 World Cup : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी महेंद्र सिंह धोनीकडे मोठी जबाबदारी
T20 World Cup : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी महेंद्र सिंह धोनीकडे मोठी जबाबदारी सोपावण्यात आली आहे. बीसीसीआयने 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2021 टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केलीय.
Indian Team for T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) खेळल्या जाणाऱ्या 2021 टी -20 वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. याशिवाय बीसीसीआयने तीन स्टँडबाय खेळाडूंची निवड केली आहे, जे टीम इंडियासोबत जातील. यात विशेष बाब म्हणजे बीसीसीआयने माजी कर्णधार एमएस धोनीवर वर्ल्डकपची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
धोनीकडे महत्वाची जबाबदारी
बीसीसीआयने 2021 टी 20 विश्वचषकासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर महत्वाची जबाबदारी सोपावली आहे. एमएस धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केला आहे. विश्वचषकासाठी 15 जणांची टीम निवडण्यातही एमएस धोनीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे. धोनीकडे एकदिवसीय वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकपसोबत अनेक मालिका जिंकण्याचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीची गणना वरच्या स्थानावर होते.
टीम इंडिया आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध
टी -20 विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. यानंतर, टीम इंडिया 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड, 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान आणि 5 नोव्हेंबर रोजी सुपर 12 मध्ये पात्रता संघ (बी -1) यांच्याशी सामना करेल.
धवन, चहल आणि अय्यरसह या खेळाडूंना स्थान नाही
शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांचा 15 जणांच्या भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, अय्यरला स्टँडबाय प्लेअरमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीमुळे या संघाचा भाग नाही. आश्चर्य म्हणजे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही.
T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, धोनीकडे मोठी जबाबदारी
अश्विन संघात परतला
यूएईच्या खेळपट्ट्या लक्षात घेऊन बीसीसीआयने फिरकी गोलंदाज आणि फिरकी अष्टपैलूंना महत्त्व दिले आहे. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि राहुल चहर हे देखील या संघाचा भाग आहेत. यासोबतच मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
असा असेल टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (व्हीसी), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.