ENG vs IND: सूर्या चमकला! आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वोच्च धावा करणारा दुसरा भारतीय; रोहित शर्मा, केएल राहुलच्या पंक्तीत स्थान
ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 आघाडी मिळवणाऱ्या भारतीय संघाला अखेरच्या सामन्यात 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय.
ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 आघाडी मिळवणाऱ्या भारतीय संघाला अखेरच्या सामन्यात 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) दमदार शतक झळकावून एकहाती झुंज दिली. परंतु, तो भारताला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं 55 चेंडूत 117 धावा ठोकल्या. तसेच भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये वयैक्तिक सर्वोच्च धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत त्यानं स्थान मिळवलं आहे.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये वयैक्तिक सर्वोच्च धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहित शर्मानं 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध इंदोर येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात 118 धावांची खेळी केली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादवचा क्रमांक लागतो. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माच आहे. त्यानं लखनऊ येथे 2018 मध्ये खेळलेल्या टी-20 सामन्यात नाबाद 111 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारताचा सलामीवीर केएल राहुल चौथ्या स्थानावर आहे. केएल राहुलनं वेस्ट इंडीजविरुद्ध 2016 मध्ये नाबाद 110 धावा ठोकल्या होत्या.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे फलंदाज-
क्रमांक | फलंदाज | वयैक्तिक सर्वोच्च धावा | विरुद्ध संघ | ठिकाण | वर्ष |
1 | रोहित शर्मा | 118 | श्रीलंका | इंदूर | 2017 |
2 | सूर्यकुमार यादव | 117 | इंग्लंड | नॉटिंगहॅम | 2022 |
3 | रोहित शर्मा | 111* | वेस्ट इंडीज | लखनऊ | 2018 |
4 | केएल राहुल | 110* | वेस्ट इंडीज | लॉडरहिल | 2016 |
भारताचा 17 धावांनी पराभव
नॉटिंगहॅमच्या ट्रेन्ट ब्रिज येथे काल खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 216 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारताला 20 षटकात 198 धावा करता आल्या. या सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या रीस टोप्लेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. त्यानं या सामन्यात चार षटकात 22 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-
- IND vs ENG 3rd T20 : सूर्यकुमारची एकहाती झुंज व्यर्थ, भारताचा 17 धावांनी पराभव, मालिका मात्र खिशात, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
- ENG vs IND, 3rd T20 : सूर्यकुमारचं शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत
- ENG vs IND, 3rd T20 : इंग्लंडला व्हाईट वॉश देण्यासाठी भारतासमोर 216 धावांचे आव्हान, सुरुवातीपासून फटकेबाजी अनिवार्य