(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Commonwealth Games 2022: भारत- पाकिस्तान यांच्यातील 'हाय व्होल्टेज' सामन्याच्या तिकीटांना मोठी मागणी
Commonwealth Games 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील लढत पाहण्यासाठी दोन्ही देशातील प्रेक्षकांमध्ये मोठी उस्तुकता असते.
Commonwealth Games 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील लढत पाहण्यासाठी दोन्ही देशातील प्रेक्षकांमध्ये मोठी उस्तुकता असते. कोणताही खेळ असो, भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर जगभराचं लक्ष असतं. बर्मिगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलै 2022 पासून रंगणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात होणार आहे. यावर्षी महिला क्रिकेट संघाला कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 31 जुलैला एकमेकांशी भिडणार आहेत. कॉमनवेल्थच्या स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकिटांच्या मागणीनं जोर धरलाय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात प्रेक्षक मोठी गर्दी करण्याची अपेक्षा आहे. कारण कामनवेल्थची आतापर्यंत 12 लाख तिकीट विकली गेली आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्याही तिकीटांची मोठ्या प्रमाणात विक्री झालीय, अशी माहिती व्यवस्थापनानं दिलीय.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सचे सीईओ इयान रीड काय म्हणाले?
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सचे सीईओ इयान रीड म्हणाला आहे की, "मी क्रिकेटचा मोठा चाहता आहे. क्रिकेटच्या फायनल आणि सेमीफायनल सामन्यांची तिकीट विकली गेली आहेत. तर, भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नुकतंच भारतीय पुरूष संघानं या मैदानावर कसोटी सामना खेळला आहे. त्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघ या मैदानावर खेळणार आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उस्तुकता आहे."
कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिला सामना कधी?
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमधील पहिला क्रिकेटचा सामना 29 जुलै रोजी खेळला जाईल. या स्पर्धेतील सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन स्टेडियमवर खेळला जाईल. क्रिकेटमध्ये सुवर्णपदक आणि कांस्यपदकासाठी 7 ऑगस्टला सामना होईल. या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आलीय.
कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघ
हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, एस.मेघना, तानिया भाटिया, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमा रोड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.
हे देखील वाचा-
- South Africa T20 League: दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल; मुंबई, चेन्नईसह 6 संघामध्ये रंगणार टी-20 क्रिकेटचा थरार!
- Washington Sundar: काऊंटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा, पदार्पणाच्या सामन्यातच वॉशिंग्टन सुंदरची चमकदार कामगिरी
- WI vs IND: भारताला टक्कर देण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ सज्ज- निकोलस पूरन