VIDEO : हवेत चित्त्यासारखी झेप घेत जिमी नीशमनं घेतला अफलातून झेल! व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
Pretoria Capitals vs Durban Super Giants : दक्षिण आफ्रिकेच्या टी20 लीगमध्ये, प्रिटोरिया कॅपिटल्सचा खेळाडू जिमी नीशमने एक अतिशय अप्रतिम झेल घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
SAT20 : क्रिकेटच्या मैदानात बॅट आणि बॉलनेच नाही तर फिल्डिंगमधूनही कमाल करता येते आणि सगळ्याचं लक्ष वेधून घेता येतं, हे क्रिकेटर जिमी नीशम यांनं (Jimmy Neesham) यानं दाखवून दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेची लीग अर्थात S20 (SA20) लीगमध्ये, स्पर्धेतील 28 वा सामना प्रिटोरिया कॅपिटल्स आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्सचा खेळाडू जिमी नीशम याने अप्रतिम झेल टिपून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. हा झेल टिपण्यासाठी नीशमने हवेत एक लांब उडी घेतली. नीशमचा या कॅचचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. त्याचा व्हिडिओ S20 च्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील शेअर करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
हा झेल पकडण्यासाठी नीशमने एक लांब उडी घेतल्याचं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. जोशुआ लिटल गोलंदाजी करत असताना त्याने हा झेल टिपला. लिटल संघाचं 14वं आणि वैयक्तिक तिसरं षटक टाकत होता. हा त्याच्या षटकातील शेवटचा चेंडू होता. या षटकात लिटलला आधीच बऱ्याच धावा पडल्या होत्या. त्याने शेवटच्या पाच चेंडूत 19 धावा दिल्या होत्या. त्याने शेवटचा चेंडू फलंदाज वियान मुल्डरला टाकला. मुल्डरला हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खेळायचा होता, पण तिथे क्षेत्ररक्षणावर असलेल्या जिमी नीशमने चेंडू पुढे जाऊ दिला नाही आणि अगदी चित्त्याप्रमाणे झेप घेत झेल घेतला. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नीशमने या झेलसाठी आधी उडी मारली आणि नंतर एका हाताने तो पकडला. झेल घेतल्यानंतर तो जमिनीवर पडला. या झेलद्वारे वियान मुल्डरचा डाव 9 धावांवर संपुष्टात आला.
पाहा VIDEO-
Jimmy Neesham with a spectacular grab 😲🤯🤯🤯#Betway #SA20 #PCvDSG @Betway_India pic.twitter.com/MfA8UUFpDd
— Betway SA20 (@SA20_League) February 5, 2023
डर्बन सुपर जायंट्सने मिळवला मोठा विजय
या सामन्यात डर्बन सुपर जायंट्सने 151 धावांनी मोठा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या डर्बन सुपर जायंट्स संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 254 धावा केल्या. यामध्ये यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने 44 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 104 धावांची धडाकेबाज खेळी केली. धावांचा पाठलाग करताना प्रिटोरिया कॅपिटल्सचा संघ 13.5 षटकांत अवघ्या 103 धावांत गुंडाळला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :