IND vs AUS: ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका 2-1 ने जिंकेल, अनुभवी माजी कर्णधाराने मालिका सुरू होण्यापूर्वी केली भविष्यवाणी
Border-Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जाणार असून 9 फेब्रुवारीपासून सामन्याला सुरुवात होईल.
IND vs AUS, Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यास काही काळ शिल्लक आहे. गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) या मालिकेतील पहिला सामना सुरु होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) या कसोटी मालिकेतील निकालाचा अंदाज वर्तवला आहे. या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ 2-1 असा विजय मिळवेल अशी भविष्यवाणी जयवर्धनेने व्यक्त केली आहे.
या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांमधील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियन संघाने शेवटची कसोटी मालिका 2-1 ने 2004 च्या भारत दौऱ्यावर जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत भारतात एकही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन संघ जिंकू शकलेला नाही. पुढे बोलताना महेला जयवर्धने म्हणाला, ''ही कसोटी मालिका खूप रोमांचक असणार आहे, परंतु या कसोटी मालिकेचा निकाल काय असेल हे सांगणं तसं कठीण आहे. पण माझ्या मते ऑस्ट्रेलिया ही कसोटी मालिका 2-1 ने जिंकेल पण त्यांच्यासाठी हे सोपं असणार नाही. तसंच दोन्ही संघांकडे उत्कृष्ट गोलंदाजआहेत आणि अशा स्थितीत ज्या संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करतील त्या संघाच्या बाजूने मालिकेचा निकाल अपेक्षित आहे.''
ऑस्ट्रेलियाला दुखापतीचा धक्का
या कसोटी मालिकेतील दोन्ही संघांची गोलंदाजी पाहिल्यास ती खूपच प्रभावी आहेत. जिथे भारताकडे रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाच्या रूपाने दोन अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाकडे कर्णधार पॅट कमिन्सशिवाय नॅथन लियॉन देखील आहे, ज्याने यापूर्वीही भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला आहे. तसंच ऑस्ट्रेलियन संघाला मालिका सुरू होण्यापूर्वी 2 मोठे धक्के बसले असले आहेत. संघाचे 2 प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड नागपूर कसोटीत अनफिट असल्यामुळे संघाबाहेर गेले आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू कॅमेरून ग्रीनच्या खेळण्याबाबतही शंका कायम आहे.
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
हे देखील वाचा-