MCA Elections 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच, आशिष शेलार विरुद्ध संदीप पाटील सामना रंगणार
MCA Elections 2022 : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार होती. पण पुढे ढकल्यामुळे आता निवडणूक 20 ओक्टोबर रोजी होणार आहे.
MCA President Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी यंदा एक राजकीय नेता आणि माजी क्रिकेटर यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे. यावेळी राजकीय नेता म्हणजे भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि माजी क्रिकेटर म्हणून संदीप पाटील (Sandeep Patil) या दोघांची नावं चर्चेत आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) अर्थात एमसीएच्या (MCA) त्रैवार्षिक निवडणुकीची चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. एमसीएची ही बहुचर्चित निवडणूक मागील महिन्यात 28 सप्टेंबरला होण्याची शक्यता होती. पण काही कारणांमुळे त्यादरम्यान निवडणूक न होता ती पुढे ढकलण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये एमसीए अध्यपदासाठी लढत रंगणार आहे. याआधी म्हणजेच 2011 मध्ये माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात अध्यपदासाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी विलासरावांनी वेंगसरकरांना मात दिली होती. आता यंदाही राजकीय नेता क्रिकेटरवर भारी पडणार की संदीप पाटील आशिष शेलारांना मात देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
आशिष शेलार यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत ते अध्यपदाच्या निवडणूकीसाठी रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं. दरम्यान शेलार यांच्या या निर्णयाबाबत टाईम्स ऑफ इंडियाला आपली प्रतिक्रिया देताना संदीप पाटील म्हणाले, ''आम्ही एक योग्य निवडणूक होईल अशी आशा करतो. तसंच जो योग्य उमेदवार आहे तो जिंकेल. भारतात जो ही पात्र आहे त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आम्ही लवकरच आमचं कॅम्पेन सुरु करु. तसंच अखेर मतदार कोणाला मत देऊन कोणाची निवड करतात हे महत्त्वाचं असणार आहे.''