जाडेजाची लॉटरी, तर केएल राहुलची उचलबांगडी; BCCI च्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये कुणाचं प्रमोशन, तर कुणाचं डिमोशन?
BCCI Announces Annual Player Retainership 2022-23: BCCI नं 2022-23 हंगामासाठी भारतीय खेळाडूंची वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली आहे. ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला बढती देण्यात आली आहे. त्याचा A+ ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे.
BCCI Announces Annual Player Retainership 2022-23: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) 2022-23 सीझनसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली आहे. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या यादीत स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजाला बढती मिळाली आहे. आता त्याचा समावेश A+ ग्रेडमध्ये झाला आहे. तर केएल राहुलची 'ए ग्रेड'वरून उचलबांगडी झाली असून त्याचा समावेश 'बी श्रेणी'त करण्यात आला आहे. बीसीसीआयनं एकूण 26 खेळाडूंना वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये स्थान दिलं आहे.
बीसीसीआयनं जाहीर केलेल्या यादीत काही खेळाडूंचं प्रमोशन झालं आहे, तर काहींचं डिमोशन. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बऱ्याच काळापासून दुखापतीचा सामना करत असलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी A+ ग्रेडमध्ये आपली जागा कायम ठेवली आहे. आता या तिघांसोबत आणखी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याचा समावेश वार्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्ट A+ ग्रेडमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आता या यादीत समाविष्ट झालेल्या खेळाडूंची संख्या चारवर पोहोचली आहे. या चार खेळाडूंना ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत 7 कोटी रुपये मिळतील.
NEWS 🚨- BCCI announces annual player retainership 2022-23 - Team India (Senior Men).
— BCCI (@BCCI) March 26, 2023
More details here - https://t.co/kjK4KxoDdK #TeamIndia
हार्दिक-अक्षरचंही प्रमोशन
हार्दिक पांड्या (Hardik Pandya), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल याचा A ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल आधी B ग्रेडमध्ये होता आणि हार्दिक पांड्या C ग्रेडमध्ये होता, पण आता दोघांचंही प्रमोशन झालं आहे. चेतेश्वर पुजारा, केएल राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे अनुभवी फलंदाज मात्र या लिस्टमध्ये बी ग्रेडमध्ये आहेत. यंदा या लिस्टमध्ये शुभमन गिललाही बढती मिळाली आहे.
बी ग्रेडमधील खेळाडूंना 3 कोटी रुपये मिळणार आहेत. उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह आणि यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत हे ग्रेड C चा भाग आहेत आणि त्यांना 1 कोटी रुपये मिळतील. भरत, ईशान किशन आणि अर्शदीप सिंह यांना पहिल्यांदाच कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये स्थान मिळालं आहे.
'या' खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून वगळलं
वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यांचा मात्र या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. दोघांनाही कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून वगळण्यात आलं आहे. रहाणे आणि इशांत यांना गेल्या मोसमात बी ग्रेड करार देण्यात आला होता. यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी, सलामीवीर मयंक अग्रवाल आणि अष्टपैलू दीपक चहर यांनाही या लिस्टमधून वगळण्यात आलं आहे. यावेळी चार खेळाडूंना A+ ग्रेड, A ग्रेडमध्ये पाच, B ग्रेडमध्ये सहा आणि C ग्रेडमध्ये सर्वाधिक 11 खेळाडूंना स्थान मिळालं आहे.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट प्लेयर्स (ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत) :
- ग्रेड A+ (7 कोटी रुपये वार्षिक) : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा.
- ग्रेड A (5 कोटी रुपये वार्षिक) : हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल.
- ग्रेड B (3 कोटी रुपये वार्षिक) : चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल.
- ग्रेड C (1 कोटी रुपये वार्षिक) : उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत. .
महत्त्वाच्या इतर बातम्या :
BCCI ने केली वार्षिक कराराची घोषणा, संजूला मिळाली संधी, पाहा 26 खेळाडूंची संपूर्ण माहिती