एजाज पटेलनं पुन्हा 'मुंबई' जिंकली, 10 विकेट्स घेतलेला बॉल MCA कडे सोपवला
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारतानं (IND Vs NZ) कसोटी मालिका जिंकली. दरम्यान, भारताच्या विजयासह न्यूझीलंडच्या फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याच्याही कामगिरीची चर्चा सुरू आहे.
Mumbai Cricket Association: न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारतीय क्रिकेट संघानं (IND Vs NZ) दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकली. दरम्यान, भारताच्या विजयासह न्यूझीलंडच्या फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याच्याही कामगिरीची चर्चा सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात एजाज पटेलनं भारताच्या दहाही खेळाडूंना माघारी धाडून मोठा पराक्रम केलाय. या कामगिरीमुळं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. यातच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष विजय पाटील (Vijay Patil) यांनी एजाजला भारत- न्यूझीलंड कसोटी सामन्याचा स्कोरशीट देऊन त्याचा सत्कार केला. तर, एजाजनंही मोठ्या मनानं 10 विकेट्स घेतलेला चेंडू आणि त्याची जर्सी एमसीएला भेट दिलीये. या दोन्ही वस्तू मुंबईत तयार होणाऱ्या एमसीएच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
अनिल कुंबळे आणि एजाजव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता. कसोटीच्या एका डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केलाय. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजानं घराबाहेर हा पराक्रम केला आहे. कुंबळे आणि लेकर यांनी घरच्या मैदानावर 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 गडींना बाद केलंय. यात त्यानं 12 षटकं निर्धाव टाकलीत. तर 2.49 च्या सरासरीनं 119 धावा दिल्या आहेत. अनिल कुंबळेनं पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका इनिंगमध्ये 10 गडी बाद केले होते. एजाजनं न्यूझीलंडकडून मुंबई कसोटीच्या आधी 10 सामने खेळले होते. त्यात त्यानं तीन वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली. त्याच्या नावावर 10 कसोटीत 29 विकेट घेतल्याची नोंद आहे.
एजाजचं मुंबईत घर
न्यूझीलंडच्या कसोटी संघातील फिरकीपटू एजाज पटेलचा जन्म 1988 साली मुंबईत झाला होता. ज्यानंतर 1996 मध्ये एजाजचं संपूर्ण कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झालं. दरम्यान 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. एजाजचं एक घर अद्याप जोगेश्वरी येथे आहे. त्याची आई ओशिवारा येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होती. तर, त्याचे वडील रेफ्रिजरेशनचा व्यवसाय करायचे. कोरोना महामारीच्या आधी त्याचे कुटुंबीय प्रत्येक वर्षी भारतात सुट्टीसाठी यायचे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-