(Source: Poll of Polls)
Ind vs NZ : न्यूझीलंडचा 372 धावांनी दारुण पराभव; भारताने कसोटीसह मालिकाही जिंकली
IND vs NZ 2nd Test : भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत विजयात मोठा वाटा उचलला.
IND vs NZ Test Match : दुसऱ्या कसोटीत भारताने न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. चौथ्या दिवसांचा खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या पाऊण तासाच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीचा फडशा पाडला. भारताच्या रविंद्रचंद्र अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी चार बळी टिपत किवींचा डाव अवघ्या 167 धावांत गुंडाळला.
कानपूर येथे झालेली पहिली कसोटी नाट्यमयरीत्या अनिर्णित राहिली होती. पहिल्या कसोटीत भारताचा विजय हुकला होता. त्यामुळे मालिकेतील दुसरी कसोटी अतिशय निर्णायक होती.
भारताला विजयासाठी अवघ्या 5 बळींची आवश्यकता होती. भारताचा विजय न्यूझीलंडचे फलंदाज किती लांबवतात याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी चाहत्यांना विजयासाठी फार वेळ प्रतिक्षा करायला लावली नाही.
कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा फिरकीपटू जयंत यादव हा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. रचिन रविंद्रला १८ धावांवर बाद करत जयंत यादवने दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर जयंत यादवने न्यूझीलंडला एकाच षटकात दोन धक्के दिले. काइल जेमीसन आणि टीम साऊथी यांना त्याने भोपळा फोडण्याचीही संधी दिली नाही. एकाच षटकात दोघेही बाद झाले. त्यानंतर विल्यम सोमरव्हिलेला तंबूत माघारी धाडत किवींना 9 वा धक्का दिला. त्यानंतर रविचंद्र अश्विनने हेनरी निकोल्सला बाद करत भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तिसऱ्याच दिवशी किवींचा पराभव निश्चित
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची खराब सुरुवात झाली. अश्विनने सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांना बाद केले. त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रॉस टेलर बाद झाला. मात्र, दुसरीकडे डॅरिल मिशेलनं संघाचा डाव सावरला आणि त्यानं 92 चेंडूत 60 धावा केल्या. परंतु, 35 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्यानंतर टॉम ब्लंडल 37 व्या षटकात धावचीत झाला. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने पाच बळी गमावून 140 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचा पराभव निश्चित केला. भारतीय गोलंदाजांनी किवींचा पहिला डाव 62 धावांवर गुंडाळला होता.
ऐतिहासिक कसोटी
वानखेडे स्टेडियमवर झालेला दुसरा कसोटी सामना हा ऐतिहासिक ठरला. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल याने भारताच्या पहिल्या डावात सर्व 10 गडी बाद केले. अशी कामगिरी करणारा हा जगातील तिसराच गोलंदाज ठरला. पटेलने भारताच्या दुसऱ्या डावातही 4 गडी बाद केले. वानखेडे स्टेडियमवर कसोटीत सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Ajaz Patel : काल स्वप्न पाहिलं आज पूर्ण केलं; एजाजचा वानखेडेवरील 'तो' फोटो व्हायरल!
- Anil Kumble on Ajaz Patel : 'वेल कम टू क्लब!' एजाजच्या विक्रमानंतर अनिल कुंबळेंचं ट्वीट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha