Team India : अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला लोळवलं,भारत देखील हिशोब चुकता करणार,वर्ल्ड कप फायनलच्या पराभवाचा वचपा काढणार?
AFG vs AUS : ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननं पराभूत केल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. भारतीय संघ देखील वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढू शकतो.
सेंट लूसिया : अफगाणिस्ताननं (Afghanistan) ऑस्ट्रेलियाला (Australia) 21 धावांनी पराभूत केलं. अफगाणिस्ताननं विजय मिळवत मोठी खळबळ उडवून दिली आहे. अफगाणिस्तानच्या विजयानं रोहित शर्माकडून (Rohit Sharma) भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. वनडे वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या 201 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानला पराभूत केलं होतं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत बदला घेतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये अफगाणिस्तानला ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीमुळं पराभव स्वीकारावा लागला होता.
अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 148 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी 127 धावांवर बाद केलं. या विजयामुळं अफगाणिस्ताननं वनडे वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढल्याचा बोललं जात आहे. वनडे वर्ल्ड कपच्या सामन्यात 201 धावांची खेळी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलनं आज देखील दमदार फलंदाजी केली. आज ग्लेन मॅक्सवेलनं 59 धावा करत एकहाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आलं नाही. ग्लेन मॅक्सवेल वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.
ग्लेन मॅक्सवेलनं वाढवलेलं राशिद खानचं टेन्शन
ग्लेन मॅक्सवेलनं वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या हातून विजय हिसकावला होता. टी 20 वर्ल्ड कपमध्ये देखील ग्लेन मॅक्सवेलनं अफगाणिस्तान विरुद्ध आक्रमक फलंदाजी सुरु केली होती. ग्लेन मॅक्सवेलनं चौकार आणि षटकारांसह 59 धावा केल्या होत्या. वनडे वर्ल्ड कप प्रमाणं ग्लेन मॅक्सवेल मॅच हातून घेऊन जाणार अशी स्थिती असतानाच राशिद खाननं गलबदीन नैबला गोलंदाजी दिली. नैबननं ग्लेन मॅक्सवेलची महत्त्वाची विकेट काढली. यामुळं अफगाणिस्तानच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.
भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या
ऑस्ट्रेलियानं ज्या प्रमाणं वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला पराभूत केलं होतं. त्याप्रमाणं भारतीय संघाला देखील अंतिम फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियानं पराभूत केलं होतं. अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानं भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघानं सुपर 8 मध्ये उद्या होणाऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा, अशा आशा चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. ग्रुप 1 मधील पहिल्या दोन लढती भारतानं जिंकल्या आहेत. रोहित शर्माच्या टीमनं देखील ऑस्ट्रेलियाचा हिशोब चुकता करावा, अशा आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आहेत.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया सुपर 8 मध्ये उद्या सायंकाळी आमने सामने येणार आहेत. या लढतीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :