(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanket Sargar wins silver medal : स्पॉंडिलायसिससारख्या गंभीर दुखापतीशी झुंज, वयाच्या 21 व्या वर्षी रौप्य पदकाला गवसणी
CWG 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने पहिलं पदक मिळवलं आहे. भारताचा वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली.
Commonwealth Games 2022 : स्पॉंडिलायसिससारख्या गंभीर दुखापतीशी झुंज, वडीलांची पानाची टपरी असल्यामुळे परिस्थितीही जेमतेम अशात संपूर्ण देशाच्या अपेक्षाचं ओझं खांद्यावर घेऊन वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या संकेत महादेव सरगरने (Sanket Sargar) रौप्य पदक मिळवलं आहे. यंदाच्या कॉमनवेल्थमधलं (Commonwealth Games) भारताचं हे पहिलंच पदक असल्यानं संकेतवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय पण या यशामागे एक मोठा संघर्ष होता. जाणून घेऊयात संकेतचा रौप्य पदकापर्यंतचा प्रवास...
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला पहिलं वहिलं पदक संकेतनं मिळवून दिलं. 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत त्याने ही कामगिरी केली. स्पर्धेदरम्यानच हाताला दुखापत झाली, ज्यामुळे केवळ एक किलो वजन कमी पडल्यानं संकेतचं गोल्ड हुकलं. पण तरीही त्याची ही कामगिरी कमाल आहे. आज वयाच्या 21 व्या वर्षी संकेतनं पदक मिळवलं असलं तरी त्याचा पदकापर्यंतचा प्रवास वयाच्या 13 व्या वर्षी पासून सुरु झाला. 2013-14 पासून सांगलीच्या दिग्विजय वेटलिफ्टींग इंस्टिट्युटमध्ये त्याने वेटलिफ्टींगचे धडे घेण्यास सुरुवात केली. मग 2017 सालपासून मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पुढील सराव सुरु केला. विशेष म्हणजे मयूर सिंहासने हे देखील उत्तम वेटलिफ्टर होते पण काही कारणांमुळे ते 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभाग घेऊ शकले नाही, पण यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये आपल्या शिष्याकडून देशाला पदक मिळवून देण्याचं ध्येय त्यांनी उराशी बांधलं आणि ते यशस्वी देखील करुन दाखवलं.
कोरोनामुळे सरावात व्यत्यय
मयूर यांनी संकेतचा सराव सुरु करताच 2018 पासून राज्यस्तरीय स्पर्धेत संकेत सहभागी होऊ लागला. 2019 ते 2020 दरम्यान तर संकेतचा परफॉर्मंस उच्च स्तरावर होता. जानेवारी 2020 ते मार्च 2020 दरम्यान तर सलग 4 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत त्याने सुवर्णपदक मिळवलं. पण त्याचनंतर कोरोना महामारीने जन्म घेतला आणि सर्व जनजीव विस्कळीत झालं. यातच संकेतची ट्रेनींगची सगळी लयबद्धता बिघडली. लॉकडाऊनमुळे इंस्टीट्यूट बंद ठेवावं लागलं. पण कोच मयूर सिंहासनेंच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने त्याने ट्रेनिंग सुरु ठेवली. पण त्याचदरम्यान त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. निदान झालं गंभीर स्पॉंडीलोलायसिसचं, तर स्पॉंडीलोलायसिस म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर शरीरातील मुख्य भाग असणाऱ्या मणक्याचीच झीज सुरु होऊ लागते. अशा गंभीर दुखापतीवरही संकेतने मात केली. मुंबईतील फिजियथेरपिस्टच्या मदतीने आणि ऑनलाईन एक्सरसाईजने अवघ्या दोन महिन्यात त्याने या स्पॉंडीलोलायसिस दुखापतीवर मात केली. इतक्या कमी वेळात ही कमाल करण सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारं होतं.
इतिहासातील कॉमनवेल्थ खेळणार सांगलीचा दुसरा खेळाडू
पुढील काळात आणखी कसून सराव करत फेब्रुवारी 2022 मध्ये सिंगापुर इंटरनेशनल मध्ये नवीन उचांक नोंदवत 2022 कॉमनवेल्थसाठी संकेतने एन्ट्री मिळवली आणि कै. मारुती माने यांच्या नंतर राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सहभाग घेणारा सांगलीतील दुसरा खेळाडू आहे ठरला. विशेष म्हणजे मारुती देशाला पदक मिळवून देऊ शकले नव्हते पण संकेतने ही कमाल करुन दाखवली, ज्यानंतर आता अवघ्या देशाला त्याचा अभिमान आहे.
हे देखील वाचा -