(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karun Nair : 22 चेंडूत ठोकल्या 106 धावा! 7 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या खेळाडूचा कहर; पुनरागमनाबाबत मोठं वक्तव्य
Karun Nair News : 7 वर्षांपासून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी आसुसलेला करुण नायर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Karun Nair Century In Maharaja Trophy : 8 वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये कर्नाटकचा फलंदाज करुण नायरने चेन्नईत इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत इतिहास रचला होता. त्याने 300 धावांची शानदार खेळी करत इतिहासाच्या पानात आपले नाव लिहिले. माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनंतर आंतरराष्ट्रीय कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या सामन्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.
7 वर्षांपासून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी आसुसलेला करुण नायर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी मंगळुरू ड्रॅगन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात करुण नायरने तुफानी शतक ठोकले.
करुण नायरने ठोकले झंझावाती शतक
महाराजा ट्रॉफी 2024 मध्ये सोमवारी म्हैसूर वॉरियर्सचा सामना मंगळूर ड्रॅगन्सशी झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात म्हैसूरचा कर्णधार करुण नायरने 48 चेंडूत 124 धावांची स्फोटक खेळी केली. 258.33 च्या स्ट्राईक रेटने खेळताना करुणने या खेळीत 13 चौकार आणि 9 षटकार मारले. म्हणजेच त्याने फक्त चौकार-षटकार मारून त्याने 22 चेंडूत 106 धावा केल्या.
करुण नायरच्या शानदार शतकाच्या जोरावर म्हैसूर वॉरियर्सने स्कोअरबोर्डवर 226 धावा केल्या. प्रत्युत्तरात मंगळूर ड्रॅगन्स संघाला पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात 14 षटकात 138 धावा करता आल्या आणि म्हैसूर वॉरियर्सने डीएलएस पद्धतीने सामना 27 धावांनी जिंकला.
7 वर्षे मिळाली नाही संधी
एखादा खेळाडू आपल्या देशासाठी त्रिशतक झळकावतो आणि त्यानंतर लगेचच दुर्लक्ष केले जाते हे फारच दुर्मिळ आहे. मात्र, करुण नायरच्या बाबतीतही असेच घडले. संघाबाहेर राहिल्यानंतर त्याच्या कामगिरीतही घसरण झाली आणि त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत. महाराजा ट्रॉफी 2024 मध्ये शतक झळकावून त्याने शानदार पुनरागमनाची चिन्हे दाखवली आहेत. आशा आहे की तो हा फॉर्म कायम राहिली आणि टीम इंडियामध्ये त्याच्या स्थानासाठी दरवाजे ठोठावत राहील. करुण नायरने भारताकडून शेवटचा सामना 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
सामन्यानंतर झालेल्या संवादादरम्यान करुण नायरने आपल्या शानदार फलंदाजीबद्दल वक्तव्य केले. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना तो म्हणाला की, असे वाटते की मी माझी आतापर्यंतची सर्वोत्तम फलंदाजी करत आहे. आणि माझा खेळ कुठे आहे हे मला माहीत आहे. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी त्याचा पुरेपूर फायदा घेतो. मी अजूनही रोज सकाळी उठतो आणि पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहतो. गतवर्षी आम्ही रणजी करंडक जिंकू शकलो नाही पण यावेळी आम्ही ती जिंकण्याचा प्रयत्न करू.
संबंधित बातमी :