Australian Open 2023 ट्रॉफीवर नोवाक जोकोविचनं कोरलं नाव, नदालच्या रेकॉर्डशीही केली बरोबरी
Australian Open 2023 : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा पराभव केला आहे.
Novak Won Australian Open 2023 : टेनिस खेळाचा स्टार खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच यानं (Novak djokovic) त्याच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनच्या (Australia Open 2023) पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये त्यानं ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा (Stefanos Tsitsipas) पराभव केला आहे. नोवाकनं स्टिफनोसला 6-3,7-4 आणि 7-6 अशा असा सरळ सेटमध्ये पराभूत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे यासोबत त्यानं स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेलच्या ग्रँडस्लॅमच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. नोवाकनं ऑस्ट्रेलिया ओपन जिंकल्यामुळे त्याच्याकडील ग्रँडस्लॅमची संख्या 22 झाली आहे. त्याने नदालच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सोबतच नोवाकचं हे 10 वं ऑस्ट्रेलिया ओपनचं जेतेपद असून नदालनंही 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. याशिवाय नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावून जगातील नंबर वन खेळाडू बनला आहे.
View this post on Instagram
मागील वर्षी मुकला होता ऑस्ट्रेलिया ओपनला
2021 मध्ये नोवाकनं ऑस्ट्रेलिया ओपनचं जेतेपद पटकावलं होतं. पण कोविड प्रोटोकॉलमुळे 2022 च्या सीझनमध्ये तो खेळू शकला नाही. स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लसीकरण अनिवार्य केलं होते, तर नोव्हाकला लसीकरणासंबंधीची माहिती सार्वजनिक करायची नव्हती. त्यामुळे तो 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन खेळू शकला नव्हता. तसंच आजच्य़ा सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, चौथ्या मानांकित नोवाकनं ग्रीसच्या त्सित्सिपासचा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचने पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. यानंतर सर्बियन स्टार नोवाकला दुसरा आणि तिसरा सेट जिंकण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. हे दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये गेले, जोकोविचने दुसरा सेट 7(7)-6(4) ने जिंकला. त्यानंतर तिसरा सेट 7(7)-6(5) ने जिंकला.
विम्बल्डनमध्येही केली होती ऐतिहासिक कामगिरी
नोवाक हा मागील काही वर्षात इतकी अप्रतिम कामगिरी करत आहे, की त्याने दिग्गज खेळाडू राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांना तगडी झुंज दिली आहे. विम्बल्डन 2022 या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देऊन विजेतेपद पटकावलं. जोकोविचनं सलग चौथ्यांदा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा पराक्रम यावेळी केला होता. विशेष म्हणजे त्या जेतेपदासह त्याच्याकडं 21 ग्रँड स्लॅम झाली होती. ज्यामुळे त्यानं ग्रेट टेनिस प्लेअर असणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला (Roger Federer) मागे टाकलं होतं. ज्यानंतर आता टॉपवर असणाऱ्या राफेलशीही त्याने बरोबरी साधली आहे.
हे देखील वाचा-