एक्स्प्लोर
बांगलादेशला धूळ चारुन भारताला आशिया चषक जिंकण्याची संधी
पाकिस्तानचा हरवून बांगलादेशने फायनलचं तिकीट बूक केलं होतं. आता आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि बांगलादेश यांची लढत होत आहे.

मुंबई/दुबई | रोहित शर्माची टीम इंडिया आशियाई क्रिकेटवरचं आपलं वर्चस्व दाखवून देण्यासाठी आज दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवर दाखल होईल. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला बांगलादेशशी होत आहे. पाकिस्तानचा हरवून बांगलादेशने फायनलचं तिकीट बूक केलं होतं. टीम इंडियाने सुपर फोर साखळीत बांगलादेशचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला होता. भारतीय गोलंदाजांनी आणि भारतीय फलंदाजांनीही सुपर फोरच्या सामन्यात बांगलादेशवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण त्या पार्श्वभूमीवर फायनलच्या लढाईत बांगलादेशचं आव्हान कमी लेखता येणार नाही. कारण त्याच बांगलादेशने तमिम इक्बाल आणि शकिब अल हसनसारख्या बिनीच्या शिलेदारांच्या अनुपस्थितीत सुपर फोरच्या मैदानात बलाढ्य पाकिस्तानला लोळवलं. पाकिस्तानवरच्या या विजयाने बांगलादेशला नक्कीच नवा जोश आणि नवा आत्मविश्वास दिला असेल. बांगलादेशच्या खेळाडूंमधला आणि त्यांच्या पाठीराख्यांमधला उत्साह ही त्यांची मोठी ताकद आहे. टीम इंडियाला ऑन द फिल्ड आणि ऑफ द फिल्डही त्या उत्साहाचा बोचरा अनुभव आला आहे. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बड्या बड्या संघांची हवा काढून घेणारा संघ म्हणून ख्याती मिळवली आहे. टीम इंडियाने बांगलादेशकडून ढाक्यात चारवेळा आणि 2007 सालच्या विश्वचषकात एकदा पराभवाची कटू चव चाखली आहे. त्यामुळे फायनलची लढाई जिंकायची तर बांगलादेशला कमी लेखण्याचा धोका टीम इंडिया पत्करणार नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने सलामीला दाखवलेलं सातत्य ही आशिया चषकात टीम इंडियाची सर्वात जमेची बाजू आहे. रोहितने चार सामन्यांमध्ये 269, तर धवनने चार सामन्यांमध्ये 327 धावांचा रतीब घातला. त्या दोघांनी अखेरच्या सुपर फोर सामन्यातून विश्रांती घेतली आणि अफगाणिस्तानने तो सामना टाय करण्याचा पराक्रम गाजवला. त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पायचीत देण्याचा निर्णय चुकीचा होता असं मान्य केलं तरी धोनीला घडणारा धावांचा उपवास टीम इंडियाला परवडणारा नाही. दुबईतल्या संथ खेळपट्ट्यांवर जिथे छोट्या लक्ष्यांचा पाठलाग करणंही कठीण ठरतंय, तिथे धोनीची बॅट तळपण्याची प्रतीक्षा आता त्याच्या कट्टर चाहत्यांनाही सहन होत नाही. भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराचं वेगवान, तर कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा आणि केदार जाधवचं फिरकी आक्रमण आशिया चषकात जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांना फायनलमध्येही आपल्या लौकिकाला जागावं लागेल. इंग्लंडच्या कसोटी मालिकेतल्या लाजिरवाण्या पराभवाची खरं तर भरपाई होऊ शकत नाही. पण त्या पराभवाच्या ओल्या जखमेवर आशिया चषक किमान फुंकर घालू शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या टाय सामन्यानेही टीम इंडियाला आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्या हुकलेल्या विजयाने छोट्या सरदाराचं रडू थांबता थांबत नव्हतं. त्यामुळे टीम इंडियाचं नाणं पुन्हा खणखणीत वाजवून दाखवायचं आणि भारतीय मनाला नवी उभारी द्यायची तर रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदांना आशिया चषक जिंकावाच लागेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















