Kesari Kusti Spardha 2023: पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, अमित शाहांच्या हस्ते उद्घाटनाची तयारी
Amit Shah in Kesari Kusti Spardha 2023 : यंदाच्या केसरी कुस्ती स्पर्धेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार आहेत.
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ( Maharashtra Kesari Kusti Spardha) पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धा पार पडणार आहे यंदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केसरी स्पर्धेला उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिली. यंदाच्या केसरी स्पर्धेत 47 संघातील 900 हून अधिक मल्ल होणार सहभागी होणार आहेत.
66 वी केसरी कुस्ती स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी सांगितले की, 47 संघातील 900 हून अधिक मल्ल सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्पर्धेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. 1 ते 7 नोव्हेंबर ही केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तसाच वेळ मागितला असल्याची माहिती खासदार तडस यांनी दिली. तारीख अजून मिळाली नसल्याने कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांना कळवले नसल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
खरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठली ? पुण्याची की धाराशीवची ?
रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने यावर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लोणीकंद जवळील फुलगाव येथे आयोजित करणार असल्याचं जाहीर केलंय. या स्पर्धेसाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे. मात्र, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदने खरी कुस्तीगीर परिषद आपलीच असल्याचा दावा केलाय. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा वाद यावर्षी पुन्हा निर्माण होणार आहे. बृजभुषण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कुस्ती महासंघाने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती आणि भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कुस्तीगीर परिषदेला मन्यता दिली होती.
या नव्या कुस्तीगीर परिषदेकडून पुण्यातील कोथरुडमध्ये मागील वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने न्यायालयात दावा दाखल केला आणि रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कुस्तीगीर परिषदेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर बृजभुषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी आरोप केल्यानंतर त्यांचे भारतीय कुस्ती महासंघचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने आपणच खरी संघटना असल्याचा दावा केला आणि आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशीवला होणार असल्याच जाहीर केलं. मात्र आता रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील संघटनेने पुण्यात स्पर्धा होणार असल्याच जाहीर केलंय. त्यामुळे प्रतिष्ठेची समजली जाणारी केसरी कुस्ती स्पर्धा नेमकी खरी कोणती आहे, असा प्रश्न कुस्तीप्रेमींना पडला आहे.