National Sport Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्र पदकतालिकेत अव्वल स्थानी; वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्सपटूंची पदककमाई
37th National Games : पणजी येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले असून आज तीन सुवर्ण, 5 रौप्य, 4 कांस्य पदकाची कमाई केली.
पणजी : गोवा येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राकडून वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्सपटूंची पदककमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके मिळवली. तर, जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके पटकावली. महाराष्ट्राने तीन सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 12 पदके मिळवून पदकतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. सेनादल दुसऱ्या स्थानावर आहे.
वेटलिफ्टिंग
दोन राष्ट्रीय विक्रमांसह दिपाली गुरसाळेचे सोनेरी यश; वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदकांची कमाई
दिपाली गुरसाळेने गोवा येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांसह वेटलिफ्टिंगमधील सुवर्णपदक पटकावले. याचप्रमाणे मुकुंद आहेरने रौप्य आणि शुभम तोडकरने कांस्य पदक प्राप्त केले. कॅम्पल मैदानावर सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने तीन पदकांची कमाई केली.
महिलांच्या 45 किलो वजनी गटात दीपाली गुरसाळेने स्नॅचमध्ये 75 किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 90 किलो असे एकूण 165 किलो वजन उचलले. यातील स्नॅच 75 किलो आणि एकूण वजन 165 किलो असे दोन राष्ट्रीय विक्रम तिने नोंदवले. पश्चिम बंगालच्या चंद्रिका तरफदारीने एकूण 162 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले. चंद्रिकाने क्लीन अँड जर्कमध्ये 95 किलो वजनासह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तर तेलंगणाच्या टी प्रिय दर्शिनीने (161 किलो) कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राची आणखी एक स्पर्धक सारिका शिंगरेला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या 55 किलो गटात आहेरने स्नॅचमध्ये 112 किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 137 किलो असे एकूण 249 किलो वजन उचलले. या गटात सेनादलाच्या प्रशांत कोळीने सुवर्णपदकावर नाव कोरले. प्रशांतने स्नॅचमध्ये 115 किलो आणि एकूण 253 किलो वजन उचलून दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. 230 किलो वजन उचलणाऱ्या आंध्र प्रदेशच्या एस गुरू नायडूला कांस्यपदक मिळाले.
पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात शुभम तोडकरने 263 किलो वजन उचलून कांस्य पदक संपादन केले. त्याने स्नॅचमध्ये 115 किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 148 किलो वजन उचलले. सेनादलाच्या चारू पेसीने 267 किलोसह सुवर्ण आणि सिद्धांत गोगोईने 266 किलोसह रौप्य पदक मिळवले.
दिपालीची कामगिरी कौतुकास्पद -अजित पवार
महाराष्ट्राची युवा वेटलिफ्टर दिपालीने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत. तिची हीच कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. यामुळे निश्चितपणे राज्यातील युवा खेळाडूंनाही यातून प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे दिपाली ही महाराष्ट्रातील सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. तिच्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिपालीवर कौतुकाचा वर्षाव केला.
जिम्नॅस्टिक्स
महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्स संघाला सुवर्ण
जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारामध्ये बुधवारी महाराष्ट्राने दोन सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके पटकावली. महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्स सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने एकूण 240.90 गुणांची कमाई करताना सोनेरी यश मिळवले. या संघात रिचा चोरडिया, संयुक्ता काळे, निशिका काळे आणि किमया काळे यांचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षिका मधुरा तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. जम्मू काश्मीर संघाला रौप्य पदक मिळाले तर हरियाणा संघाला कांस्य पदक मिळाले.
याचप्रमाणे पुरुषांच्या ट्रॅंपोलिन क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या आदर्श भोईरने सुवर्ण आणि आयुष मुळेने कांस्य पदक मिळवले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रामुख्याने सेनादल व केरळच्या खेळाडूंचे आव्हान होते. भोईरने 48.37 गुणांची कमाई केली आणि सुवर्णपदक जिंकले. त्याचा सहकारी आयुषने कांस्य पदक मिळवताना 46.12 गुण नोंदविले. सेनादलाच्या मनू मुरलीने 46.70 गुणांसह रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्राच्या या दोन्ही खेळाडूंना संजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच महिलांच्या सर्वसाधारण विभागात महाराष्ट्राच्या श्रद्धा तळेकरने कांस्यपदक जिंकले. तिला उडीसाची ऑलिम्पिकपटू प्रणिती नायक आणि पश्चिम बंगालची आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणती दास यांचे आव्हान होते. श्रद्धाने त्यांना चांगली लढत दिली आणि 41.45 गुणांसह तिसरे स्थान घेतले. नायकने 45.60 गुणांसह सुवर्णपदक जिंकले तर दासने रौप्यपदक जिंकताना 43.95 गुण नोंदवले.
रग्बी
महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी
रग्बी 7-एस स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी झाले. महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटकला 48-0असे नामोहरम केले. तसेच पुरुष गटात महाराष्ट्राने बिहारचा 19-12 असा पराभव केला.