(Source: ECI/ABP News/ABP Majha)
37th National Games 2023 : हॉकी शूटआऊटमध्ये महाराष्ट्र उत्तरेकडून पराभूत; कांस्यपदक हुकले!
37th National Games 2023 : उत्तर प्रदेशविरुद्ध निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआऊटमध्ये महाराष्ट्राचा हॉकी संघ १-३ अशा फरकाने पराभूत झाला.
37th National Games 2023 : उत्तर प्रदेशविरुद्ध निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआऊटमध्ये महाराष्ट्राचा हॉकी संघ १-३ अशा फरकाने पराभूत झाला. त्यामुळे युवराज वाल्मीकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे कांस्यपदक हुकले. पेड्डीम क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेतील कांस्यपदकाच्या लढतीत पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. दुसऱ्या सत्रात २४व्या मिनिटाला मनीष यादवने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत मध्यंतराला उत्तर प्रदेशला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सत्रात ३६व्या मिनिटाला युवराजने पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने गोल करीत महाराष्ट्राला १-१ अशी बरोबरी साधून दिली. अखेरचे सत्र रंगतदार ठरले. ५३व्या मिनिटाला तईब शाहने महाराष्ट्राला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पण सहा मिनिटांनी (५९व्या मिनिटाला) राजू पालने उत्तरेला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामन्याचा निकाल शूटआऊटपर्यंत लांबला.
शूटआऊटमध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तरेच्या शिवम आनंदने गोल केल्यानंतर तईबने महाराष्ट्राला १-१ अशी बरोबरी साधून दिली. दुसऱ्या प्रयत्नात उत्तरेचा अजित यादव आणि महाराष्ट्राच्या अजिंक्य जाधवला गोल नोंदवण्यात अपयश आले. तिसऱ्या प्रयत्नात मनीष यादवने गोल करीत २-१ अशी उत्तरेला आघाडी मिळवून दिली. पण महाराष्ट्राचा अक्षय आव्हाड अपयशी ठरला. चौथ्या प्रयत्नात उत्तरेचा विशाल सिंग आणि महाराष्ट्राचा वेंकटेश केंचे गोल नोंदवू शकले नाहीत. मग पाचव्या प्रयत्नात राजकुमार पालने गोल करीत उत्तरेच्या विजयावर ३-१ असे शिक्कामोर्तब केले. मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने कांस्यपदक पटकावले होते. पण यंदा महाराष्ट्राच्या पदकलाटेत हॉकीकडून पदक मात्र मिळू शकले नाही. महाराष्ट्राचा महिला संघ साखळीतच गारद झाला. महाराष्ट्राच्या पुरुष संघातील जुगराज सिंगने हॅट्ट्रिकसह एकूण ७ गोल नोंदवले. तर वेंकटेशने ४ गोल केले.
स्क्वे मार्शल आर्ट्स, सात पदकांची लयलूट
महाराष्ट्राने स्क्वे मार्शल आर्ट् क्रीडा प्रकारात बुधवारी सात पदकांची लयलूट केली. यात योगिता खाडे आणि शिवराज वरघाडे यांच्या सुवर्णपदकांचा समावेश आहे. महिलांच्या ७० किलो वजनी गटात योगिताने बाजी मारली. या गटात गोव्याच्या मिताली तामसेने रौप्य तसेच सरला कुमारी (राजस्थान) आणि निकिता कौर (दिल्ली) कांस्यपदकांच्या मानकरी ठरल्या. पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात शिवराज अव्वल ठरला. या गटात गोव्याच्या मंजू मालगावीने रौप्यपदक, तर अभिषेक गंभीर (दिल्ली) आणि हर्षवर्धन एलएस (कर्नाटक) यांना कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या आस्था गायकीने ४६ किलो वजनी गटात आणि आणि वैशाली बांगरने ७० किलोंवरील वजनी गटात रौप्य पदके पटकावली. याचप्रमाणे महाराष्ट्राच्या हुजैफा ठाकूर (५४ किलो), वेदांत सुर्वे (६२ किलो) आणि अश्विनी वागज् (६६ किलो) यांनी कांस्यपदके मिळवली.