Yavatmal News : स्मशानाविना गाव, प्रेताला अग्नी देताना गावकऱ्यांची दमछाक, संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर
Yavatmal News : यवतमाळच्या कळंब तालुक्यातील किनाळा गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना प्रेतावर अंत्यसंस्कार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. संतप्त गावकऱ्यांनी यवतमाळ-वणी राज्य महामार्ग रोखला.
Yavatmal News : भारतीय स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला. एकीकडे 75 वर्षात भारताने केलेल्या प्रगतीमुळे सर्व भारतीयांनी मान अभिमानाने उंचावलेली असतानाच दुसरीकडे अप्रगत भारत पाहून शरमेने मान झुकली जात आहे. देशातीन अनेक भाग मूलभूस सोयी सुविधांपासून वंचित आहे. पालघरमधील आदिवासी भागात रस्ते आण आरोग्य व्यवस्था नसल्याने दोन चिमुक्याल्यांचे जीव गेल्याची घटना ताजी असतानाच यवतमाळमधील (Yavatmal) गावात स्मशानभूमीच (Graveyard) नसल्याने मृत्युनंतरही परवड काही थांबायचं नाव घेत नाही.
यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील किनाळा गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना प्रेतावर अंत्यसंस्कार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. गावात आज (19 ऑगस्ट) एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने गावकरी संतप्त झाले. या संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोखून स्मशानभूमी बांधण्याची मागणी केली. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्याने गावकऱ्यांनी प्रेतावर अंत्यसंस्कार केले.
यवतमाळ-वणी राज्य महामार्गवर किनाळा गाव आहे. या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही स्मशानभूमी नाही. त्यामुळे गावातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर गावकऱ्यांना अंतिम संस्कार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मिळेल त्या रिकाम्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यातच पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना पाऊस थांबल्याशिवाय हे कर्मच करता येत नाही. स्मशानभूमीच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिलं. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं.
आज या गावातील दुलसिंग राठोड नावाच्या व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. प्रेताची होत असलेली हेळसांड बघून गावकरी आक्रमक झाले. या संतप्त गावकऱ्यांनी यवतमाळ ते वणी राज्य महामार्ग रोखून धरला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन गावात दाखल झालं. त्यावेळी गावकरी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक वाद झाला. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी प्रेतावर अंत्यसंस्कार केले.
गावात मरणानंतरही त्यांच्या यातना कमी होण्याचं नाव घेत नाही. अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमी मिळावी या मागणीसाठी गावकऱ्यांना वारंवार रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागत असेल तर ही बाब यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांसाठी शरमेची आहे. त्यामुळे आतातरी या गावकऱ्यांचा आवाज सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी ऐकून काही कारवाई करणार का, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.