Yavatmal Crime : रक्ताच्या नात्यावरच घाव, यवतमाळमध्ये वर्षभरात 74 जीवे मारण्याच्या घटना, नागपूरलाही मागे टाकलं!
Yavatmal Crime : यवतमाळ जिल्ह्यात वर्षभरात जवळपास 75 खुनांच्या घटनांची नोंद झाली आहे. मात्र, रक्ताच्या नात्यावरच घाव टाकण्याच्या घटनांमध्ये होणारी वाढ ही समाजस्वास्थासाठी चिंताजनक आहे.
Yavatmal Crime : शेतकरी आत्महत्येसाठी ओळखला जाणाऱ्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात गुन्हेगारीचाही आलेख वाढत आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये तब्बल 74 हत्येच्या घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे राज्याची क्राईम कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरलाही मागे टाकणारा यवतमाळ जिल्ह्याचा आकडा आहे. नागपुरात गेल्या वर्षभरात 64 घटना घडल्या होत्या तर यवतमाळ जिल्ह्यात 74 हत्येच्या घटना घडल्या.
सर्वाधिक खून कौटुंबिक वादातून
विशेष म्हणजे संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचाली काही प्रमाणात मंदावल्या आहेत. मात्र, क्षुल्लक कारणातून वाद विकोपाला जाण्याच्या घटना घडत आहेत. पती-पत्नीतील वाद, मुलगा आणि वडील, भाऊ-भाऊ यांच्यात कौटुंबिक कारणासह संपत्ती, शेतजमिनीची हिस्सेवाटणी, व्यसनाधीनता आदी कारणांतून रक्ताच्या नात्यावरच घाव घालून संपवले जात आहे. 2022 वर्षात सर्वाधिक खून हे कौटुंबिक वादातूनच झाल्याचे दिसून येतं. शासनाने ग्रामीण भागात नैराश्येच्या गर्तेत असलेल्या अशा नागरिकांचे सर्वेक्षण करुन समुपदेशन करण्याची गरज पडल्यास त्यांना औषधोपचार करुन अशा घटना टाळता येणार आहे, असं मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार म्हणाले.
खुनांच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग
शहरी आणि ग्रामीण भगत सहजतेने उपलब्ध अवैध दारु गांजा, गुटका सहजतेने उपलब्ध होत आहे. बेरोजगार आणि पैशाच्या हव्यासापोटी अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. अशातच कौटुंबिक वाद विकोपाला जात आहेत. शहरी भागात अल्पवयीन मुले गांजाच्या आहारी गेले आहेत. गुन्हेगारी टोळ्यांकडून त्यांचा हेतुपुरस्सर वापर केला जात आहे. खुनाच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून आला आहे. मात्र या सर्वच घटना गुन्हेगारी संबंधित नाही. काही घटना गुन्हेगारी वर्तुळाशी वर्चस्वाच्या लढाईतून घडल्या. आहेत तर काही घटना नात्यागोत्यातील संबंधातील आहे, असं क्राईम रिपोर्टर सतीश येटरे यांनी सांगितलं.
शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात असा बदल का होत आहे? एका बाजूला गुन्हेगारी का वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला नात्यागोत्यात असहिष्णुता का येत आहे? छोट्या छोट्या कारणांमुळे रक्ताच्या नात्यावरच घाव टाकण्याच्या घटनांत होणारी वाढ ही समाजस्वास्थासाठी चिंताजनक आहे. संबंधातील एकमेकांच्या जीवावर का उठत आहेत? यावर विचार मंथन करण्याची आज गरज येऊन ठेपली आहे.
वर्षभरात झालेल्या हत्या
घरगुती वाद -13
भावाच्या मनाचा बदला - 1
अज्ञात कारण - 4
अतिक्रमण काढणे प्रकरण - 1
अनैतिक संबंधातून - 10
चारित्र्याच्या संशय - 6
शेतीशी निगडित - 5
जुनेभांडण वाद सोडवणे - 7
कौटुंबिक कलह, वाद विकोपाला जाणे - 27
मागील पाच वर्षातील हत्या
2018 - 55
2019 - 58
2020 - 68
2021 - 67
2022 - 74
तडीपार
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 - 1
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 - 48
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 57 - 07
एमपीडीए - 10
मोक्का - 2
VIDEO : Yavatmal Crime : यवतमाळमध्ये गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ, नागपूरलाही मागे टाकलं