धक्कादायक! वनरक्षक भरतीच्या अंतिम निवड परीक्षेत धावला चक्क डमी उमेदवार; मूळ उमदेवार छत्रपती संभाजीनगरचा, तर डमी जालन्याचा रहिवासी
Yavatmal News: वनरक्षक भरतीच्या अंतिम निवड परीक्षेत एका उमेदवाराने 5 किलोमीटर धावण्याच्या चाचणी परीक्षेत चक्क डमी उमेदवाराला उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यवतमाळ : वनरक्षक भरतीच्या (Forest Guard Recruitment) अंतिम निवड परीक्षेत एका उमेदवाराने 5 किलोमीटर धावण्याच्या चाचणी परीक्षेत चक्क डमी उमेदवाराला उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रवींद्र सोमनाथ पायगव्हाण (रा. पळशी जि. छत्रपती संभाजीनगर) असे त्या मूळ उमेदवाराचे नाव आहे. तर प्रदीप राजपूत (रा. जालना) असे डमी उमेदवाराचे नाव आहे. यवतमाळ वन विभागाच्या वतीने 89 जागांसाठी 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान भरती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी प्रादेशिक निवड समितीच्या वतीने यातील उतीर्ण उमेदवारांचे व्हिडिओ तपासतांना ही बाब वन विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. या प्रकरणामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची पुढील तपास पोलीस (Yavatmal News) करत आहे.
परीक्षेत धावला चक्क डमी उमेदवार
यवतमाळ वन विभागाच्या वतीने 89 जागांसाठी भरती परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळशी येथील रहिवासी असलेल्या रवींद्र पायगव्हाण या उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. यामध्ये 25 किलोमीटर धावण्याची चाचणी रवींद्रने पूर्ण केली. परंतु 24 जानेवारीला 5 किलोमीटर धावण्याच्या चाचणीमध्ये रवींद्रने जालन्यातील प्रदीप राजपूत या डमी उमेदवाराला उतरवले. ही बाब अंतिम निवड यादी तयार करताना लेखी परीक्षा, धाव चाचणी आणि पायदळ चाचणी परीक्षेत उमेदवारांचे व्हिडिओ टॅली करताना वन विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आली.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी रवींद्र पायगव्हाण याला बोलावले असता चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून वन विभागातील अधिकाऱ्यांनी रवींद्रला घेऊन अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले. रवींद्र पायगव्हाण आणि प्रदीप राजपूत यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दोघांवर विरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी माहिती देतांना यवतमाळ वन विभागाचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे म्हणाले की, वनविभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान धाव चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर धाव चाचणीचा निकाल लागल्यानंतर वनविभागाच्या निर्देशानुसार 25 किलोमीटर धाव चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. ही धाव चाचणी झाल्यानंतर प्रादेशिक निवड समिती यांनी आपण ज्या उमेदवाराची अंतिम निवड करणार आहोत, अशा सर्वांची पडताळणी करून घेतली. या दरम्यान आम्हाला यात एक उमेदवार असा आढळून आला, की ज्याने परीक्षा दिली आहे, मात्र पाच किलोमीटरच्या नंतर त्याच्या ऐवजी दुसरा डमी उमेदवार धावण्यासाठी पाठवले असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर आम्ही संबंधित उमेदवाराला पत्राद्वारे कळवले आणि पुढील चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर प्रादेशिक निवड समिती यवतमाळ च्या वतीने या उमेदवाराची सखोल चौकशी केली असता या चौकशीमध्ये त्यांने केलेले कृत्य मान्य केले. त्यानंतर या उमेदवारावर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत असल्याचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या