Bhavana Gawali : संजय राठोडांनी लोकसभा घेतली तर मी त्यांची विधानसभा घेणार; यवतमाळमध्ये भावना गवळींचे जाहीर वक्तव्य
Yavatmal Washim Lok Sabha Election : 'मै मेरी झाशी नहीं दुंगी' असं म्हणत भावना गवळींनी पुन्हा एकदा यवतमाळ-वाशिम लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत.
यवतमाळ: एकीकडे राज्यभरात महायुतीचे मेळावे होत असताना दुसरीकडे त्यामधील घटकपक्षांतील नाराजीही समोर येत आहे. यवतमाळमधल्या महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटामधल्या दोन नेत्यांमध्येच वर्चस्ववादाची लढाई जुंपल्याचं दिसून आलं. 'मै मेरी झाशी नहीं दुंगी' असं म्हणत भावना गवळींनी (Bhavana Gawali) पुन्हा एकदा यवतमाळ-वाशिम लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचाही भावना गवळींनी भाषणात उल्लेख केला. संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा मी घेणार असं भावना गवळी म्हणाल्या.
दोन दिवसांपूर्वीही भावना गवळी यांनी लोकसभेच्या निवडणुकीवरून भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय हा वरिष्ठ घेणार आहे. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात मीच प्रबळ दावेदार आहे. सात्यत्याने पाचवेळा युतीमधून निवडून आले असून या वेळीदेखील मीच उमेदवार असणार. प्रत्येक पक्षाला वाटते की आपल्या पक्षाचा आपला उमेदवार असावा, त्यात काही वावगं नाही.
या आधीही भावना गवळींनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून जाहीर वक्तव्य केलं होतं. यवतमाळ वाशिम मतदारसंघात मीच निवडणूक लढवणार असल्याचं सांगत जर महायुतीने दुसरा उमेदवार दिला तर त्याला विरोध करण्याचे संकेत दिले होते. महायुतीच्या वतीने या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्यात येणार असून त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे.
यवतमाळ वाशिम शिवसेनेचा बालेकिल्ला
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. पण यावेळेची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. यावेळी शिवसेनामध्ये फूट पडलेली आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांना साथ दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरू आहे अशी चर्चा सुरू आहे.
पोहरादेवीचे महंत सुनील महाराज या ठिकाणाहून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघातल बंजारा समाजाची मतं मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या उमेदवारीचा फायदा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. तेदेखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जातंय.
ही बातमी वाचा: