(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cancer Day 2024 : जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास नेमका काय? वाचा या दिनाचं महत्त्व आणि यंदाची थीम
World Cancer Day 2024 : कर्करोगाशी लढण्यासाठी, आपल्याला या आजाराबद्दल, ते कसे टाळायचे आणि त्याचे निदान कसं करावं? याबद्दल सर्वकाही माहित असणं महत्वाचं आहे.
World Cancer Day 2024 : दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा केला जातो. जागरूकता वाढवण्यासाठी आणि रोगाच्या उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा एक जागतिक उपक्रम आहे. दरवर्षी लाखो लोकांना कर्करोगामुळे आपला जीव गमवावा लागतो. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे कॅन्सरबद्दल जागरूकता वाढविणे. तसेच, या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना नवी आशा देणे असा आहे. या ठिकाणी जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास आणि महत्त्व नेमकं काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो?
जागतिक कर्करोग दिन हा कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिन जागतिक कर्करोग घोषणेच्या उद्दिष्टांना समर्थन देण्यासाठी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलच्या नेतृत्वात आहे.
जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास
जागतिक कर्करोग दिन 2000 मध्ये कर्करोग विरुद्ध जागतिक शिखर परिषदेच्या (युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने (UICC)) उद्घाटनाच्या वेळी स्थापित करण्यात आला. पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जगातील अनेक देश आणि त्यांच्या संबंधित सरकारांमधील कर्करोग संघटनांचे अनेक प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय नेते उपस्थित होते.
जागतिक कर्करोग दिनाचे महत्त्व
कॅन्सर हा असा आजार आहे की, ज्याला कोणीही हलक्यात घेणं महागात पडू शकतं. ही अशी स्थिती आहे ज्यामुळे मानवी शरीरातील काही पेशी नियंत्रणाबाहेर जातात आणि शरीराच्या इतर भागात पसरतात. कर्करोग मानवी शरीरात कुठेही विकसित होऊ शकतो. यासाठी त्याबद्दल स्वतःला शिक्षित करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
जागतिक कर्करोग दिन 2024 ची थीम
जागतिक कर्करोग दिनाची थीम दरवर्षी वेगवेगळी असते. त्यानुसार, यावर्षीची कर्करोग दिनाची थीम "कॅन्सर केअर गॅप कमी करा" अशी आहे. खरंतर, आपल्यापैकी प्रत्येकामध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. फक्त त्याची योग्य अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही या दिनाची मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येते.
महत्त्वाच्या बातम्या :