Biggest Thefts : काय ती चोरी... काय ती प्लानिंग; जगातील 5 सर्वात मोठे दरोडे
World Biggest Thefts : जगातील सर्वात मोठ्या पाच चोऱ्या कोणत्या आहे ते जाणून घ्या. या चोऱ्यांसाठीचा चोरट्यांचा प्लॅन ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
World Biggest Robbery : बॉलिवूडचा 'धूम' चित्रपट आणि अलिकडच्या काळात प्रसिद्ध झालेली 'मनी हाईस्ट' (Money Heist) ही वेबसीरीज खूप प्रसिद्ध झाली होती. यामधील चोरांची अनोखी शक्कल पाहून सारेच थक्क झाले. पण खऱ्या आयुष्यातही घडलेल्या मोठ्या दरोड्याबद्दल तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात मोठ्या दरोड्यांमधील चोरांचा प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. जगातील सर्वात मोठ्या पाच दरोडे कुठे आणि कशा प्रकारे करण्यात आले ते जाणून घ्या.
1. ब्राझीलच्या फोर्टालेझा येथील दरोडा (Brazil Fortaleza Bank Robbery)
ब्राझीलमधील फोर्टालेझा येथील चोरी ही जगातील सर्वात मोठा दरोडा आहे. फोर्टालेझा येथील एका बँकेत काही चोरांनी शक्कल लढवत चोरी केली. चोरांची योजना ऐकून आजही लोक आश्चर्यचकित होतात. 2005 साली दरोडेखोरांनी बँको सेंट्रल बँकेच्या शाखेजवळ एक मालमत्ता भाड्याने घेतली आणि नंतर त्यामध्ये बांधकाम सुरू केलं. ही त्यांची योजना होती, कारण चोरांना बँक लुटायची होती. त्यासाठी त्यांनी 256 फुटांचा बोगदा खोदला, जो थेट बँकेच्या तिजोरीमध्ये जाणारा होता. त्यानंतर दरोडेखोरांनी बँक लुटली आणि सुमारे 3.5 टन ब्राझिलियन नोटा लंपास केल्या. या चोरीमध्ये 500 कोटींहून अधिक रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
2. सेंट्रल बँक ऑफ इराकमधील चोरी (The Central Bank of Iraq Robbery)
इराकमधील बगदाद येथे 2003 साली शहरात चोरांनी जगातील सर्वात मोठा दरोडा टाकल्याचं म्हटलं जात. बगदादच्या सेंट्रल बँक ऑफ इराकमध्ये झालेली चोरी जगातील सर्वात मोठा बँक दरोडा असल्याचं बोललं जातं. या चोरीमध्ये सुमारे 7 हजार कोटी रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या चोरीबाबत अशीही अफवा पसरली आहे की, हुकूमशाह सद्दाम हुसेन यानेच ही चोरी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सद्दाम हुसेनच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्याच्या ठिकाणाहून सुमारे 650 दशलक्ष डॉलर्स जप्त करण्यात आले, तेव्हा चर्चांना आणखी उधाण आलं होतं.
3. लंडनमध्ये इटालियन दरोडेखोरांनी केलेली चोरी (Knightsbridge Security Deposit Robbery)
इटालियन माफिया एकेकाळी संपूर्ण जगावर राज्य करत होते. त्या काळी जगात क्वचितच असा एखादा देश असेल जिथे इटालियन माफियांची दहशत नव्हती. 1987 मध्ये इटलीतील कुख्यात गुन्हेगार व्हॅलेरियोने लंडनमध्ये मोठी चोरी केली होती. 1987 मध्ये इटलीचा कुख्यात गुन्हेगार व्हॅलेरियोने लंडनमधील बँक लुटण्याची योजना आखली आणि बँकेतून सुमारे 800 कोटी रुपये चोरले. व्हॅलेरियो आपल्या एका साथीदारासोबत लंडनच्या एका बँकेत खाते उघडण्यासाठी गेला होता, पण तिथे पोहोचल्यानंतर त्याने मॅनेजरला ताब्यात घेतलं.
मॅनेजरला ओलीस ठेवल्यानंतर व्हॅलेरियोने बाकीच्या साथीदारांना बँकेच्या आत बोलावले आणि या सर्वांनी बँकेतून सुमारे 800 कोटी रुपये चोरले. चोरी केल्यानंतर व्हॅलेरियो दक्षिण अमेरिकेत पळून गेला आणि काही काळ मजेत घेत राहिला. पण, त्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे त्याला तुरुंगात जावं लागलं. व्हॅलेरियो आपली फेरारी शिप करण्यासाठी इंग्लंडला परतला आणि तिथून त्याला लंडन पोलिसांनी अटक केली.
4. रॉयल मेल ट्रेनमधील चोरी (Royal Mail Train Robbery)
रॉयल मेल ट्रेन दरोड्यावर अनेक चित्रपट आणि वेबसीरीज बनवण्यात आल्या आहेत. हा दरोडा इंग्लंडमधील बकिंगहॅमशायरमध्ये 1963 मध्ये झाली होती. रॉयल मेल ट्रेन ग्लासगोहून मौल्यवान वस्तूं घेऊन येत होती. काही महिन्यांपूर्वीच चोरट्यांनी या ट्रेनवर दरोडा टाकण्याचं नियोजन केलं होतं. 15 चोरांनी या ट्रेनवर दरोडा टाकला. चोरट्यांनी ट्रॅकवरील सिग्नलशी छेडछाड केली आणि रॉयल मेल ट्रेन एका निर्जन ठिकाणी थांबवली आणि तिथेच ट्रेनमधील मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या. या चोरीमध्ये सुमारे 33 कोटी रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
5. डनबर बँक दरोडा (The Dunbar Bank Robbery)
डनबर बँक दरोडा घटनेवर चित्रपट आहे. अगदी चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच हा दरोडा टाकण्यात आला. 1997 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डनबर बँकेत चोरी झाली होती, ज्याचा मास्टरमाईंड या बँकेतच काम करणारा रिजनल सेफ्टी इन्स्पेक्टर होता. बँकेच्या रिजनल सेफ्टी इन्स्पेक्टर आपल्या 5 मित्रांसोबत मिळून चोरी केली. या बँक अधिकाऱ्याने त्याच्या दरोडेखोरांनी बँकेतील सुरक्षेमधील त्रुटींबाबत चोख माहिती पुरवली, याचा वापर करुन चोरांनी सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत बँकेतून 150 कोटींहून अधिक रोकड पळवली.