(Source: ECI/ABP News/ABP Majha)
International Labour Day 2021: का साजरा केला जातोय आतंरराष्ट्रीय कामगार दिवस? जाणून घ्या काय आहे आजच्या दिवसाचे महत्व
जगभरात आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस (International Labour Day) साजरा केला जातोय. हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 साली सुरुवात झाली.
International Labour Day: जगभरात आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातोय. हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 साली सुरुवात झाली. कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जगभर 1 मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो.
कामगार दिवसाची सुरुवात कशी झाली?
आजच्याच दिवशी, 1870 च्या दशकात अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी आपल्या कामाचे तास 8 तासांपेक्षा जास्त न करण्यासाठी आंदोलन केलं होतं. बघता बघता या आंदोलनाने मोठं रूप धारण केलं. 1 मे 1886 साली अमेरिकेत 11 हजार कारखान्यातील जवळपास 4 लाख कामगारांनी या आंदोलनात भाग घेतला आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कारखानदारांवर आणि सरकारवर दबाव आणला. कामगारांच्या या आंदोलनापुढे सरकार आणि कारखानदार झुकले. या घटनेच्या सन्मानार्थ 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. जगभरातील सुमारे 80 देशांत हा दिवस साजरा केला जातो.
भारतात कधी सुरुवात?
भारतात हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1923 साल उजडावं लागलं. सुरुवातीला या दिवसाला मद्रास दिवस या नावाने ओळखलं जायचं. भारतीय कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड सिंगरावेलू चेट्टियार यांनी भारतात हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयासमोर आंदोलन करत कामगारांच्या कामाची वेळ 8 तासांपेक्षा जास्त नको अशी मागणी केली होती.
On this International Labour Day, ILO Director-General @GuyRyder calls on workers, employers, governments and international organizations, everybody committed to building back better, to join forces, to bring in a #worldofwork with justice and dignity for all.#LabourDay2021 pic.twitter.com/JRAkuBpIHu
— International Labour Organization (@ilo) April 30, 2021
कामगार दिवसाचे महत्व
कोणत्याही समाजाच्या वा देशाच्या विकासामध्ये कामगारांची भूमिका महत्वाची असते. कामगारांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी जगभरात आजचा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी जगभरातील कामगारांना सुट्टी असते. काही देशांत कामगारांसाठी उपहाराचे आयोजन केलं जातं. आजच्या दिवशी जगभरातल्या अनेक कामगार संघटना एकत्र येतात. त्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाते. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आजचा दिवस साजरा करण्यावर अनेक बंधने आली आहेत. पण ऑनलाईन पद्धतीने आजच्या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Vaccination: लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता
- CM Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या स्थिरावली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- गुजरातच्या भरुचमध्ये मोठी दुर्घटना, कोविड सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत 12 मृत्युमुखी