गुजरातच्या भरुचमध्ये मोठी दुर्घटना, कोविड सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत 16 मृत्युमुखी
गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही
भरुच (गुजरात) : महाराष्ट्रात रुग्णालयातील दुर्घटनांच्या घटना ताज्या असतानाच, शेजारी असलेल्या गुजरात राज्यातही रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली. भरुच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये मोठी आग लागली. कोविड सेंटरमध्ये रात्री उशिरा लागलेल्या आगीत एकूण 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये 14 कोरोनाबाधित रुग्णांसह दोन नर्सचा समावेश आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास ही आग लागल्याचं समोर आलं आहे.
भरुच जिल्ह्यातील पटेल वेलफेअर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर बनवण्यात आलं होतं. चार मजली या कोविड सेंटरमध्ये रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. आग लागल्यामुळे कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु आग एवढी भीषण होती की त्यात 16 जणाचा मृत्यू झाला.
आगीत होरपळून 16 जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि सुमारे 50 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढलं. परंतु आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलीस प्रशासन घटनास्थळी हजर आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "भरुच रुग्णालयात लागल्याने प्राण गमावलेल्या रुग्णा आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांप्रती दु:ख व्यक्त करतो. राज्य सरकार दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देणार आहे."
ભરૂચની હોસ્પિટલમાં લાગેલી આગની દુર્ઘટનામાં જીવ ગુમાવનારા દર્દીઓ, ડૉક્ટરો અને હોસ્પિટલના સ્ટાફ પ્રત્યે શોકની લાગણી વ્યક્ત કરું છું. રાજ્ય સરકાર દુર્ઘટનામાં મૃત્યુ પામેલા પ્રત્યેક મૃતકોના પરિવારજનોને રૂપિયા 4 લાખની સહાય આપશે.
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) May 1, 2021