(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia-Ukraine conflict : अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा रशियाला इशारा, म्हणाल्या....
Russia-Ukraine conflict : रशिया आणि युक्रेनमधील तणाव अद्यापही निवळला नाही. यामध्ये आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे.
Russia-Ukraine conflict : रशिया आणि युक्रेनमधील तणाव अद्यापही निवळला नाही. यामध्ये आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस (Kamala Harris) यांनी रशियाला इशारा दिला आहे. युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा रशियाला कमला हॅरिस यांनी वार्षिक म्यूनिख सुरक्षा संमेलनात दिला आहे. शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनवर रशिया केव्हाही हल्ला करु शकतो, असे सांगितले होते.
म्यूनिख सुरक्षा संमेलनात कमला हॅरिस यांनी रशियाला (Russia) इशारा दिला. युक्रेनवर हल्ला केल्यास रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल. युक्रेनवर हल्ला केल्यास रशियाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. अशाप्रकरचा हल्ला झाल्यास युरोपमधील देश (European countries) अमेरिकेच्या आणखी जवळ येतील, असे हॅरिस म्हणाल्या.
राष्ट्रपती जो बायडेन यांनी युक्रेनवर रशियाने हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्र्पती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या निर्णायनंतर अस्वस्थ झाल्याचे म्हटले होते. जर्मनीमध्ये आयोजित वार्षिक म्यूनिख सुरक्षा संमेलनामध्ये (Munich Security Conference) अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी रशियाला इशारा दिला. त्या म्हणाल्या की, 'जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर अमेरिका आपल्या सहयोगी आणि भागीदारासोबत मिळून अभूतपूर्व आर्थिक निर्बंध लादण्यात येतील.' आमच्याकडून युक्रेन आणि रशिया वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. रशिया वारंवार चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगतेय. पण, तो कूटनितीद्वारे चर्चेचे सर्व रस्ते बंद करत आहे. रशियाच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे, असेही कमला हॅरिस म्हणाल्या.
अमेरिकेचा रशियाला इशारा -
दरम्यान, याआधी अमेरिकेने रशियाला इशारा दिला होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो असे म्हटले होते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन युक्रेनच्या राजधानीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली असल्याचे बायडेन यांनी म्हटले.
युक्रेनवर हल्ला की रशियाचा कट?
शुक्रवारी पूर्व युक्रेनमध्ये एका वाहनात मोठा स्फोट झाला. हा स्फोट पूर्व युक्रेनच्या डोनेट्स्क शहरात झाला. या स्फोटाबाबत अधिक माहिती समोर आली नाही. रशिया युक्रेनवर फॉल्स फ्लॅगनुसार हल्ला करू शकतो. फॉल्स फ्लॅग म्हणजे एखादा देश स्वतःच्याच भूभागावर हल्ला करतो आणि नंतर इतर कोणत्याही देशावर आरोप करतो. मग त्या हल्ल्याच्या प्रत्त्युत्तरात हल्ला करतो. रशिया-युक्रेनमध्ये तणाव वाढल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशिया फॉल्स फ्लॅगनुसार युक्रेनवर हल्ला करेल असा असा इशारा दिला होता. कारमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेसाठी रशियाने युक्रेनला जबाबदार ठरवले आहे. युक्रेन लवकरच हल्ला करणार असल्याचे रशियाने म्हटले. मात्र, रशियाचा हा दावा युक्रेनने फेटाळून लावला.